राहाता: राहाता व शिर्डी शहरासह परिसरास धुवाधार पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने अनेक भाग जलमय झाले. ओढे, नाल्यांना पूर आल्याने शेतीचे नुकसान झाले. शिर्डी-राहाता शिवेवर असलेल्या साकुरी शिवारात नगर-मनमाड रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने चार जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्यातील दोघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले. तर दोघांचे मृतदेह आढळले. ठिकठिकाणी आलेल्या पुरामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील २५ रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली होती. आज, रविवारी दुपारनंतर पाणी ओसरल्याने काही ठिकाणची वाहतूक पूर्वपदावर आली.

एकूण १८ गावांतील २७१ कुटुंबांतील १ हजार २३४ लोकांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी हलवून त्यांची निवासाची तात्पुरती व्यवस्था केली. नगर-मनमाड रस्त्यावरील श्रीखंडे वस्तीजवळील साकुरी शिवारातील ओढ्यावरील रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नगर- मनमाड रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शिर्डी, राहाता शहरासह तालुक्यात अतिवृष्टीने कहर केल्याने मोठे नुकसान झाले. शिर्डी – राहाता शिवाराजवळील हॉटेल फाउंडन शेजारील ओढ्याच्या रस्त्यावरून जाताना दोन दुचाकीवरील चौघे पाण्यात वाहून गेले. सुदैवाने बचाव पथकाला अक्षय घोडे (वय २५, रा. वाकडी, राहाता) व अमोल व्यवहारे (रा. कोपरगाव) या दोघांना वाचविण्यात यश आले. प्रसाद पोपटराव विसपुते (रा. कोपरगाव ) हा मोटरसायकलसह वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आढळला आहे तर वाहून गेलेला रोहित खरात (वय २४, रा. पंधरा चारी, राहाता) हा बेपत्ता होता, परंतु त्याचाही मृतदेह नंतर आढळल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली.

शिर्डी शहरात अतिवृष्टीमुळे रस्ते जलमय झाले असून शिर्डी-कनकुरी रस्ता पूर्ण पाण्याच्या विळख्यात तर उपनगर जलमय झाल्याने रहिवाशांचे हाल झाले. ठिकठिकाणी वृक्षांची पडझड झाली. ठिकठिकाणी पाणी तुंबून तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली तर नगर-मनमाड महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. जोरदार पावसाने वाहनांना पुढील काहीही दिसत नसल्याने तसेच पावसात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एकामागोमाग एक अशा पाच वाहनांचा अपघात झाल्याने वाहतुकीचा काहीकाळ खोळंबा झाला होता. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात एका रुग्णवाहिकेचा देखील समावेश आहे.

वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले होते. राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात पाणी आल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार आमोल मोरे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अतिवृष्टीमुळे घटनास्थळी शासकीय यंत्रणचे अधिकारी उपस्थित राहून परिस्थिती व मदतकार्य करून परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज होते.

महसूल मंडलनिहाय पाऊस मिमीमध्ये

राहाता (१६७.३), शिर्डी (१४७.८ ), लोणी (१६६.५), बाभळेश्वर (१२९ ), पुणतांबा (१२६.८) व अस्तगाव (१६७.८) तालुक्यात सरासरी १५०.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.

सरसकट पंचनामे करा

तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने कोणतेही गाव न वगळता सरसकट पंचनामे करा. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उंबरठा कापणी प्रयोगाचा निकष न पाहता पिकांची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करा. शेतकऱ्याचा अंत न पाहता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा तातडीने निर्णय घ्या. -राधूजी राऊत, शेतकरी संघटना, जिल्हाध्यक्ष

साईबाबा संस्थानची १ कोटीची मदत

श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. शिर्डीमधील अतिवृष्टीमुळे बाधित रहिवाशांसाठी साईबाबा संस्थानने साईआश्रम (क्रमांक २) येथे तात्पुरती निवास व्यवस्था व संस्थान प्रसादालयात भोजनाची व्यवस्था केली आहे. ज्या नागरिकांना गैरसोय भासत आहे, त्यांनी या सोयींचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थान प्रशासनाने केली आहे.

निळवंडेचा उजवा कालवा फुटला

निंभेरे येथे निळवंडे धरणाचा उजवा कालवा पावसाने आलेल्या प्रचंड पाण्यामुळे फुटला. त्यामुळे परिसरातील शेतीचे नुकसान झाले. कालव्याचा भराव फुटल्याने कालव्यात आलेले पाणी वडनेरकडे वळले. सुदैवाने निंभेरे येथील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान टळले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. तातडीने कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.