अहिल्यानगर : शहरातील कोठला भागात आज, मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे आढळल्याने आमदार संग्राम जगताप व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सुमारे २ तास रास्ता रोको आंदोलन करून पोलीस व महापालिका प्रशासनाचा निषेध केला. शहरातील छुप्या कत्तलखान्यांवर कारवाई झाली नाही, तर गोमातेच्या हत्येला डुक्कर कापून उत्तर दिले जाईल, असा इशारा आमदार जगताप यांनी यावेळी बोलताना दिला.

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी सूर्यास्तानंतर कारवाई करता येत नसल्याने उद्या सकाळी सूर्योदय होताच शहरातील सर्व कत्तलखान्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

आंदोलनावेळी आमदार जगताप म्हणाले, महायुती सरकारने गोहत्या बंदी कायदा आणला आहे. मात्र, तरीही जिहादी राजरोसपणे गोहत्या करत आहेत. प्रशासन याकडे कानाडोळा करत हिंदूंच्या भावनांशी खेळत आहे. शहरात कोणताही अधिकृत कत्तलखाना नाही. परंतु मुकुंदनगर, झेंडीगेटमधील घराघरांत छुपे कत्तलखाने आहेत. मध्यरात्रीनंतर गाड्या भरून जातात. रस्त्यावर गोमातेचे मांस आणून टाकणाऱ्यांना अटक होत नाही तोवर आम्ही शांत बसणार नाही.

आमदार पाचपुते म्हणाले, अतिवृष्टीचा पाहणी दौरा करून मी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जात असता कोठला भागात कुत्र्यांच्या भांडणामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यावेळी कुत्र्यांनी पिशवीतील गोमांस बाहेर काढल्यावर येथे मोठ्या प्रमाणात गोमांस टाकल्याचे निदर्शनास आले. हा अहिल्यानगरच्या प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. अधिकारीच यांच्यात सामील आहेत. ते हप्ते घेत असतील तर कत्तलखान्यांसह तुमचेही घरे पाडण्याची आमची तयारी आहे. अधिकारी जाणीवपूर्वक त्यांना पाठीशी घालत आहेत. मात्र, आता आम्ही शांत बसणार नाही.

यावेळी गोहत्या करणाऱ्याच्या व मनपा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी भगव्या टोप्या, भगवे पंचे घालून, झेंडे घेतले होते. प्रकाश भागानगरे, दिनेश जोशी, अजिंक्य बोरकर, सुरेश बनसोडे, गणेश भोसले, दिगंबर गेंट्याल आदींसह मोठ्या संख्यने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी होते.