Asaduddin Owaisi : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या अनेक नेत्यांकडून विविध मतदारसंघात जाहीर सभा घेतल्या जात आहेत. या सभांमधून आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. मात्र, या सभेच्या आधी व्यासपीठावर असदुद्दीन ओवैसी यांना पोलिसांनी नोटीस दिली. त्यामुळे या सभेस्थळी एकच चर्चा रंगली.

दरम्यान, प्रक्षोभक विधाने करू नये, अशी नोटीस पोलिसांकडून असदुद्दीन ओवैसी यांना देण्यात आली. मात्र, यानंतर सभेत बोलताना असदुद्दीन ओवैसी यांनी पोलिसांनी दिलेल्या नोटीशीवर भाष्य करत तुफान फटकेबाजी केली. पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर ती नोटीस नेमकी कशा संदर्भात होती? हे असदुद्दीन ओवैसी यांनी भर सभेत वाचून दाखवलं. तसेच यासंदर्भात बोलताना त्यांनी म्हटलं की, “मला हे लव्ह लेटर दिलंय. माझ्या सासरच्यांकडून नोटीस आली. कारण ते जावायावर खूप प्रेम करतात. आय लव्ह यू”, असं वक्तव्य असदुद्दीन ओवैसी यांनी सभेत केलं. त्यांच्या या विधानानंतर सभेतील उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.

हेही वाचा : “राहुल गांधींनीच मला राष्ट्रवादीत जायचा प्रस्ताव..” राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट

असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये आले होते ना? मग त्यांना पोलिसांनी नोटीस दिली नाही. मात्र, मला नोटीस दिली. तीन दिवसांपूर्वी मोदी देखील या ठिकाणी आले होते. मग त्यांनाही नोटीस द्यायला हवी होती ना? मी व्यासपीठावर बसलो होतो आणि पोलीस आले आणि मला नोटीस दिली तुम्ही लोकांनी देखील पाहिलं असेल. कलम १६८ प्रमाणे नोटीस दिली. मला हे लव्ह लेटर दिलंय. माझ्या सासरच्यांकडून नोटीस आली. कारण ते जावायावर खूप प्रेम करतात. आम्ही त्यांचे भाईजान पण आहोत. आय लव्ह यू”, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानामुळे सभेत मोठा हशा पिकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षानेही आपले उमेदवार उभे केले आहेत. सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएमकडून फारुख शाब्दी हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवैसी हे सोलापूरमध्ये आले होते. पण त्यांच्या भाषणाआधी व्यासपीठावर पोलिसांनी त्यांना प्रक्षोभक विधान करु नये, म्हणून नोटीस दिली. या नोटीशीनंतर त्यांनी सरकारवर आणि भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली.