कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. पण, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

अजित पवार म्हणाले, “जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत गेलं पाहिजे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं दुसरं नेतृत्व नाही. जगात भारताची मान आणि शान वाढवत प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीतून झालं आहे. ९ वर्षांच्या कालावधीत अनेक रस्ते, जल आणि विमान वाहतुकीला गती देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं.”
“८० कोटी जनतेला मोफत धान्य आपलं सरकार देत आहे. घर नसलेल्यांना घरकूल देण्याचं काम केलं जात आहे. शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला १२ हजार रूपये जमा होतात. शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.

हेही वाचा : अजित पवार म्हणाले, “प्रवक्ते उत्तर देतील”, अमोल मिटकरींचा लगेच रोहित पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “बालमित्र मंडळाच्या…”

“…म्हणून सरकारमध्ये सामील झालो”

“जनतेच्या अडचणी सोडावणे आणि बहुजन समाजाच्या कल्याणासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यात आपला कुठलाही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं की, ‘पदाचा वापर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो.’ याच शिकवणीतून आपण पुढं चाललो आहे,” असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा : “बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं”, अजित पवारांच्या विधानावर रोहित पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे”

“वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही वर्षोनुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. पण, काहीजण ऐकण्यास तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारमधील कर्मचारी ५८ व्या वर्षीच निवृत्त होतात. काहीजण ६५, ७० आणि ७५ व्या वर्षी निवृत्त होतात. मात्र, ८४ वय झालं तरी तुम्ही थांबेना… अरे काय चाललंय काय… आम्ही आहोत ना काम करायला… कुठं चुकलो तर सांगाना… आमच्यात तेवढी धमक आणि ताकद आहे. पाच ते सहावेळा उपमुख्यमंत्री पद सांभाळलं आहे,” असं सांगत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्र सोडलं आहे.