महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला असला तरी भोसरी (पुणे) येथील जागा प्रकरणात आणि इतर प्रकरणात त्यांच्यावर झालेल्या आरोपांची नि:पक्ष आणि सखोल चौकशी करणे गरजेचे असून आपण तशी मागणी राज्य शासन आणि राज्यपालांकडे करणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजप सरकार येऊन अवघ्या दीड वर्षांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या मंत्र्यांची एकामागून एक प्रकरणे समोर येत आहेत. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील जागा खरेदी प्रकरणात मोठी तफावत होती. या जमिनीचे बाजार भावाप्रमाणे मूल्यांकन करण्यात आलेले नाही. तसेच खडसे यांच्यावर इतरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही काही दिवसांपूर्वीच राज्यपालांना भेटून खडसे यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली होती. खडसे यांनी स्वत राजीनामा दिल्याने ही मागणी पूर्ण झाली असली तरी खडसे यांच्यावर जे आरोप झाले आहेत त्या आरोपाची नि:पक्ष व सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना-भाजपामध्ये सध्या मोठय़ा प्रमाणात कुरघोडय़ा चालू असून दोन्ही पक्ष एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. चांगल्या कामाचे श्रेय घेण्याची दोन्ही पक्षात मोठी स्पर्धा सुरू आहे. जनतेच्या हिताच्या निर्णयातही ही दोन्ही पक्ष आडकाठी आणत असल्याचे दिसत आहे. आम्ही काँग्रेस सोबत पंधरा वर्ष सत्तेत काम केले. मात्र, जनतेच्या हिताच्या निर्णयात कुरघोडीची भूमिका कधीच घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सरकारच्या कारभाराविरोधात प्रचंड नाराजी असून शासनाने दुष्काळाकडे दुर्लक्ष केले आहे. शासनाच्या कामगिरीवर कोणीच समाधानी नसल्याची टीकाही त्यांनी केली. याप्रसंगी आ. राणाजगजितसिंह पाटील, आ.राहुल मोटे, जीवन गोरे आदींची उपस्थिती होती.