राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशसोहळ्यास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी भाषणात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा उल्लेख करत, नाराजीही व्यक्त केली.

अजित पवार म्हणाले, “कोकणाचा व महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम सुनील तटकरेंनी करत रहावं. ज्याप्रकारे आज अवघा महाराष्ट्र मधू दंडवते यांना कोकण रेल्वे सुरू करण्याचं श्रेय देतो, त्यामध्ये अर्थातच शरद पवार यांचा खूप महत्त्वाचा पाठिंबा होता. आता मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या दशकापासून रखडलेलं आहे. हे काम सुनील तटकरे यांच्या माध्यामातून मार्गी लागावं, लोकसभा खासदार म्हणून त्यात त्यांचं महत्त्वाचं योगदान असावं. त्यांच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला अधिक चालना मिळावी, अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि ती तुम्ही पूर्ण करावी या बद्दलही मी खात्री बाळगतो. त्या मार्गाने जाणारे कोकणवासीय अक्षरशा वैतागले आहेत. कितीतरी टर्म झाल्या परंतु तो रस्ता काही होत नाही. त्या वेदना त्या रस्त्याने जाणाऱ्यांनाच होतात, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं.”

याचबरोबर अजित पवार यांनी यावेळी सुनील तटकरे यांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले की, “सुनील तटकरे यांनी त्यांच्या ३० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, विधानपरिषद आणि आता लोकसभा अशा विविध पातळ्यांवर काम केलं. रायगड जिल्हापरिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झालेली आहे. राज्यमंत्रिमंडळातही त्यांनी अतिशय महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. दोनवेळा ते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना आथा महासचिव पद मिळालेलं आह आणि त्यांची राजकीय कारकिर्द ही सतत चढती राहिलेली आहे. त्यांच्या कारकिर्दिचा आलेख असाच चढता रहावा आणि महाराष्ट्राला व राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांचं नेतृत्व लाभावं. त्यांच्या कर्तृत्व, वक्तृत्वातून फायदा होत राहो, अशाप्रकारच्या शुभेच्छा आजच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त मी देतो.”

गेली १३ वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले असून हा महामार्ग होळीपूर्वी पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मुंबई – गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर, रायगड, रत्नागिरीसह अन्य भागांतील कोकणवासियांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईत १ जानेवारीपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एक हजार ७८५ जणांनी स्वाक्षरी केली असून ही मोहीम ठिकठिकाणी महिनाभर राबविण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सामाजिक, राजकीय संघटनांनी अनेक वेळा आंदोलने केली. मात्र सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या महामार्गाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गाची दुरवस्था होत असून खड्डेमय रस्त्यामुळे अपघात होतात. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनतो. गणेशोत्सवकाळात गणेशभक्तांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.