Ajit Pawar Farmer Loan Waiver Statement: प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि कर्जमाफीसाठी आंदोलन झाले होते. या आंदोलनाला माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सरकारशी चर्चा झाल्यानंतर बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. पण, यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

कर्ज फेडण्याची सवय लावा ना…

एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “शून्य टक्के व्याजाने पैसे दिल्यानंतर तुम्ही वेळच्या वेळी कर्ज फेडण्याची सवय लावा ना. सारखेच फुकटात आणि सारखेच माफ करा म्हटल्यावर कसे व्हायचे? असे चालत नाही. एकदा साहेबांनी (शरद पवार) कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली तसेच मी उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना एकदा दिली. आता पुन्हा आम्हाला निवडून यायचे होते म्हणून आम्ही सांगितले आम्ही माफ करू, आम्ही माफ करू. जिल्हा मध्यवर्ती बँकेवरही परिणाम झाला आहे. लोक पैसे भरायलाच तयार नाहीत.”

शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, “आम्ही तुम्हाला जिथे जिथे शक्य आहे तिथे जिल्हा बँक, डीपीडीसी, जिल्हा परिषद आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मदत करू. पण सारखीच मदत मिळणार नाही. तुम्ही पण हातपाय हालवले पाहिजेत. हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.”

आमच्यासमोर वेगवेगळे प्रसंग येत आहेत

सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या योजनांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “आमच्यासमोर वेगवेगळे प्रसंग येत आहेत. आत्ताच आम्ही ३२ कोटींचे पॅकेज दिले. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली येथे आता नुकसान झाले आहे. तिथे पंचनामे करावे लागणार आहेत. तो ३२ हजार कोटींचा आकडा आता ४० हजार कोटींवर चालला आहे. आम्ही वेगवेगळ्या सवलती आणि योजना खूप मोठ्या प्रमाणावर राबवत आहोत. यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लागत आहे.”

सारखी कर्जमाफी मागायला आम्ही भिकारी नाही

दरम्यान, अजित पवार यांच्या कर्जमाफीच्या या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “शेतकरी काही भिक मागत नाही. त्यांचे म्हणणे मान्य आहे, पण सरकार म्हणून त्यांनी आधी व्यवस्था करावी. महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यावर उत्पादन किमतीपेक्षा कमी खर्चात माल विक्री करण्याची वेळ येणार नाही अशी धोरणे तयार करावीत. त्यांच्याकडे सारखी सारखी कर्जमाफी मागायला आम्ही काही भिकारी नाही.”