सातारा : लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्मगावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असे स्मारक उभे करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण पसरणी (ता. वाई) येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राधाबाई साबळे, यशोमती शिंदे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजाराम निकम, संजय साबळे, महंत सुंदरगिरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा विविध चळवळींमध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गाण्यांचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्यासह विविध दिग्गज मंडळींशी त्यांचा संपर्क आला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
शाहीर साबळे यांचे विचार पुढच्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करावेत. सातारा जिल्हाविषयी आपुलकी असून, प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या माध्यमातून सातारा येथील क्षेत्र माहुली घाटांचा विकास व सुशोभीकरण तसेच अजिंक्यतारा किल्ल्याचे ही संवर्धन केले जाणार आहे. बा.सी. मर्ढेकर यांचे मर्ढे येथील स्मारक पूर्ण झाले असून, याचेही उद्घाटन लवकर करण्यात येईल.
तसेच सातारा येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे, या संमेलनाला शासनामार्फत सर्व ती मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, पद्मश्री लोकशाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्रात चळवळीतील योगदान व सामाजिक कार्य विसरता येणार नाही. त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. शाहीर साबळे यांच्या शाहिरीची दिग्गज मंडळींनी नोंद घेऊन त्यांचे कौतुक केले.
राष्ट्रपतींच्या हस्ते शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पसरणी येथील शाहीर साबळे यांच्या स्मारकाला ३० कोटी निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करून शाहीर साबळे यांच्या नावाला साजेसे स्मारक उभे केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.
