राज्यात महिन्याभरापूर्वी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. जवळपास महिन्याभरानंतर सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. मात्र, अद्याप या मंत्र्यांना खातेवाटप झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रीमंडळ विस्तार आणि नंतर खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

“नेमकं काय कारण आहे, ते दोघांनाच माहिती”

मंत्रीमंडळ विस्तारानंतर खातेपाटपाला उशीर का होत आहे, याचं नेमकं कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती असेल, असं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. “खरंतर आता खूपच लवकर खातेवाटप करायला हवं. १७ तारखेला अधिवेशन सुरू होतंय. आज १३ तारीख आहे. अधिवेशनात प्रश्न विचारले जातात. प्रश्नाला उत्तर त्या विभागाचे मंत्री म्हणून संबंधितांचं नाव येतं. पण आता नेमकं काय कारण आहे, हे त्या दोघांनाच माहिती”, असं अजित पवार पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

“त्या दोघांचा एक आवडता शब्द झाला आहे, तो म्हणजे ‘लवकरात लवकर’! काल मी टीव्हीवर फडणवीसांचं वक्तव्य ऐकलं लवकरात लवकर खातेवाटप करणार आहोत. एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांच्या गावाला गेले. त्यांनीही सांगितलं लवकरात लवकर करणार आहोत. १४ तारखेला संध्याकाळी अनेक ठिकाणी मिरवणुका निघणार आहेत. १५ तारखेला झेंडावंदन होणार आहे. त्यावेळी पालकमंत्रीही असायला हवेत. पण साधारणपणे जे ज्या जिल्ह्यातून आलेत, त्या जिल्ह्यातच झेंडावंदन करण्याचे आदेश त्यांनी काढले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना जनतेनं थारा दिलेला नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली. “बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी ही शिवसेना स्थापन केली. मुंबईत तिची पाळंमुळं रुजली. पण ती शिवसेना फोडण्याचा प्रयत्न आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी केला, त्यांना अल्पकाळ यश मिळालं. पण नंतर ते कुणीही निवडून आले नाहीत. हे आधी छगन भुजबळ आणि नंतर नारायण राणेंबाबत घडलं. आता ते एकनाथ शिंदेंबाबत देखील घडेल असं मला वाटतं. पण एकनाथ शिंदे म्हणालेत की आम्ही २०० जागा जिंकून आणू. आता बघू मतदार राजा काय निर्णय घेतो. मतदारांना मतदानाचा अधिकार आहे. पण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला, तर त्यात फोडाफोडीचं राजकारण केलेल्यांना थारा महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला नाही”, असं अजित पवार म्हणाले.