पंढरपूर : पुढच्या वर्षीची आषाढीची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी. तसेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनलचा विजय व्हावा, असे साकडे आपण पंढरपुरात विठ्ठलाचरणी घातले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
मिटकरी हे आज विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणे बंधू वादावर मार्मिक भाष्य केले. राणे बंधू यांनी खरंतर ट्विटर वॉर करू नये. भाऊ भाऊ एकत्र राहावे. हे हिंदू धर्माचे उदाहरण आहे. रामाचा सावत्र भाऊ असणाऱ्या भरताने आपल्या भावासाठी नंदीग्राममध्ये राहून दास म्हणून राज्य पाहिले. भरताने रामाचा आदर्श घेतला. ‘हिंदू खतरे मे है…’ असे सांगत रामाचे नाव घेणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी निदान आपल्या मोठ्या भावाचे ऐकले पाहिजे. रामायणात सावत्र भाऊ एकत्र नांदतात. तर राणे बंधू यांनी जरा रामाचा आदर्श घ्यायला हवा, असे म्हणत आमदार मिटकरी यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली.
दरम्यान मिटकरी यांनी सामान्य भाविकाप्रमाणे विठ्ठलाचे सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेतले. यावेळी दर्शन रांगेत असणारी अस्वच्छता आणि सेवासुविधांचा अभाव याबाबत लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.