Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. बारामती शहरातील विकासकामांचं लोकांकडून होणाऱ्या विद्रुपीकरणावर आणि काही शासकीय कामांसाठी आणून टाकलेलं साहित्य चोरी झाल्याच्या कारणांवरून अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘ही जित्राबं बारामतीत कुठून आली?’ असं म्हणत चोरी करणाऱ्या चोराला पकडणाऱ्यास मी एक लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“आपण गुणवत्ता असणारा माल विकला पाहिजे. नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे, कुठेही घाणीचं साम्राज्य असता कामा नये. आपण शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे. बारामतीत एवढा मोठा चांगला पूल बांधला. मात्र, काहीजण काहीनाकाही चोरण्याचा प्रयत्न करातात. आता मी काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी वाळू आणून टाकली, पण काहींनी ती वाळू रात्री पिशवीत भरून चोरून नेली. ही जितराबं माझ्या बारामतीत कुठून आली? हे काय मला कळेना. मला ९५ टक्के लोक मला साथ देतात, पण काही चार ते पाच टक्के जित्राबं आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे”, अशा शब्दांत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

“नवरात्री आली की झालं त्या ठिकाणी गोधड्या धुवायला सुरुवात झाली, जे मी चांगलं काम केलं त्यावर गोधड्या आणून टाकल्या. तुमच्या घरी गोधड्या वाळू टाका ना. आपल्याकडे एवढे मैदाने आहेत, त्या ठिकाणी देखील तुम्ही टाकू शकता. मी ब्रिज केला तर त्या ठिकाणीही ब्रिजच्या खालच्या लोखंडी पट्ट्या चोरून नेल्या आणि विकून टाकल्या”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“मला आता तुम्हाला असं सांगायचं आहे की जर असं कोणी करत असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढा आणि मला पाठवा. जो कोणी ते चोर मला पकडून देतील त्यांना मी एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि जो कोणी यामध्ये अशा प्रकारे चोरी करताना सापडेल त्याला दोन लाखांचं दंड करतो”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.