सोलापूर : अक्कलकोट एसटी बस स्थानकाचे नूतनीकरण होत असताना दुसरीकडे तेथील आसपासचे ७० व्यापारी गाळे, इमारतींचे अतिक्रमण असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यांपैकी ४९ गाळे येत्या २ ऑगस्ट रोजी पाडण्यात येणार आहे.
संबंधितांना पूर्वसूचना देण्यात आल्याची माहिती अक्कलकोट नगरपालिका प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, तेथील जागा मुस्लिम कब्रस्तान विश्वस्त समितीच्या ताब्यात होती. परंतु सात-बारा रद्द झाल्यानंतर गावठाण म्हणून वादग्रस्त जागेवर नोंद झाली आहे. याबाबतचा न्यायालयीन निकाल अक्कलकोट नगरपालिकेच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे या जागेवरील अतिक्रमित गाळे जेसीबीच्या साह्याने पाडण्याचे नगरपालिका यंत्रणेने ठरवले आहे.
दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या संदर्भात रस दाखविला आहे. यापूर्वी, अक्कलकोट एसटी बसस्थानकालगतचा रस्ता मोकळा सोडावा म्हणून केलेल्या मागणीसाठी एका कार्यकर्त्याने उपोषण सुरू केले होते. त्यावर आमदार कल्याणशेट्टी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी तथा नुकतेच काँग्रेस सोडून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आश्वासन देत उपोषण सोडविले होते. त्या दरम्यान, आमदार कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने हिंदू जनआक्रोश मोर्चाही काढण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा कल्याणशेट्टी यांच्याच पाठपुराव्याने त्या परिसरातील अतिक्रमित गाळे पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.