अकोले: मुळा नदीवरील अंबित लघुपाटबंधारे तलाव मे महिन्यातच भरला. त्यामुळे मुळा नदीही मे महिन्यातच वाहती झाली आहे. भंडारदरा, निळवंडे धरणात २५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असून, आढळा धरणात ५० टक्के पाणी शिल्लक आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात आठवडाभरापेक्षा अधिक काळ मुसळधार पाऊस पडला. तुलनेत धरणांच्या पाणलोटात, पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी होते. मात्र, पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे, नाले वाहिले. त्यामुळे धरणे, तलाव मे महिन्यातच थोड्या प्रमाणात नवीन पाणी आले. हरिश्चंद्रगड परिसरातील अजा पर्वतात मुळा नदी उगम पावते. या पर्वत रांगात पडलेल्या चांगल्या पावसामुळे १९३ दशलक्ष घनफूट क्षमतेचे छोटे अंबित येथील धरण भरून वाहू लागले. अनेक वर्षांनंतर मे महिन्यातच अंबित भरले. गतवर्षी २८ जूनला अंबित भरले होते. अंबित भरल्यामुळे मुळेचे पाणी आता पिंपळगावखांड तलावात येईल. हा तलाव भरल्यानंतर मुळा नदी मुळा धरणाकडे वाहू लागेल.
जिल्ह्याची उत्तर भागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या भंडारदरा (२६.९९ टक्के) व निळवंडे धरणात (२६.७४ टक्के) सध्या समाधानकारक पाणी साठा आहे. भंडारदरातून वीजनिर्मितीसाठी ७८० क्युसेकने तर निळवंडेच्या कालव्यातून ३७० क्युसेक पाणी सोडले जात आहे. आढळा धरणात ४९.५१ टक्के पाणी साठा आहे. कालपासून तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने विश्रांती घेतली आहे.