scorecardresearch

अलिबागकरांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अधांतरीच; सत्तासंघर्षांत लोकहिताचा विषय पुन्हा एकदा अडगळीत

जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने तसेच राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने अलिबागला रेल्वे सेवेने जोडण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून केली जात होती.

अलिबागकरांचे रेल्वे सेवेचे स्वप्न अधांतरीच; सत्तासंघर्षांत लोकहिताचा विषय पुन्हा एकदा अडगळीत
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

हर्षद कशाळकर

अलिबाग : अलिबागकरांनी गेली तीन दशके पाहिलेले रेल्वे सेवेचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अलिबागला उपनगरीय रेल्वे वाहतुकीने जोडण्यात येणार असल्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतरच्या काळात राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षांत अलिबाग रेल्वेचा मुद्दा पुन्हा एकदा अडगळीत पडला.

जिल्ह्याचे मुख्यालय असल्याने तसेच राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असल्याने अलिबागला रेल्वे सेवेने जोडण्याची मागणी गेल्या तीन दशकांपासून केली जात होती. १९८०-८५ च्या सुमारास अलिबाग येथे ‘आरसीएफ’चा खत प्रकल्प कार्यान्वित झाला. या प्रकल्पातील खताची वाहतूक करण्यासाठी थळ ते पेण दरम्यान रेल्वेमार्ग टाकण्यात आला. तेव्हापासून अलिबागला प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू करण्याची मागणी केली जात होती.

सुरुवातीला कै. दत्ताजीराव खानविलकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र त्यांना फारसे यश आले नाही. नंतर अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर आणि खासदार बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनीही या रेल्वे सेवेसाठी प्रयत्न केले होते. पण शासनस्तरावर हालचाल झाली नाही. त्यानंतर अनंत गीते यांनी खासदार झाल्यावर या रेल्वे मार्गासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले. ‘यूपीए’ सरकारच्या राजवटीत मध्य रेल्वेने खासदार गीते यांची मागणी लक्षात घेऊन या मार्गाचे सर्वेक्षण केले. यानंतर अलिबाग वडखळ रस्त्यालगत २८ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र त्यासाठी भूसंपादन करावे लागणार होते. या प्रकल्पासाठी जवळपास ३४० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र हा प्रस्ताव खर्चीक असल्याने त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकला नाही. यात पाच वर्षे निघून गेली. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर खासदार गीते यांची अवजड उद्योगमंत्रीपदी वर्णी लागली, मात्र चार वर्षे अशीच निघून गेली. अलिबागच्या रेल्वेचा प्रश्न काही सुटला नाही. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा रेल्वे सेवेच्या मागणीसाठी हालचाली सुरू झाल्या.

नवा रेल्वे मार्ग टाकण्याचा प्रस्ताव खर्चीक असल्याने दुसरा प्रस्ताव तयार करण्यात आला. ‘आरसीएफ’ कंपनीच्या विद्यमान रेल्वेमार्गाचा वापर करून प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली. यामुळे प्रकल्पाचा खर्च आणि वेळ याची बचत होणार होती. चोंढी येथे रेल्वे स्थानक बांधून ही प्रवासी रेल्वे सेवा सुरू करणे शक्य असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. आरसीएफ व्यवस्थापनाने आपल्या मार्गावर प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यास हरकत नसल्याचे जाहीर केले होते. एमएमआरडीए आणि रेल्वे बोर्डाचा संयुक्त प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची उभारणी करण्याचा प्रस्ताव होता. मात्र एमएमआरडीएने आयत्यावेळी या रेल्वे मार्गासाठी निधी देण्यास नकार दिल्याने प्रकल्पाबाबत ठोस निर्णय झाला नव्हता.

गीते यांनी पुन्हा एकदा तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय खत व रसायनमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेऊन अलिबागला उपनगरीय रेल्वे वाहतुकीने जोडण्याची विनंती केली. यानंतर आरसीएफ आणि रेल्वे मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला होता. यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस आणि पीयूष गोयल यांनी अलिबागला उपनगरीय वाहतुकीने जोडण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अलिबागला रेल्वेने जोडण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तासंघर्षांला सुरुवात झाली. शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला गेला आणि अलिबागच्या रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय अनास्थेमुळे बाजूला गेला. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनीही यासंदर्भात पत्रव्यवहार केला पण त्यास फारसे यश आले नाही.

आरसीएफ कंपनीच्या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करा, अशी मागणी मी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. १९८५ पासून पेण ते चोंढी दरम्यान रेल्वे मार्ग अस्तित्वात आहे. दररोज त्यावरून मालवाहतूक होत असते. त्यामुळे या मार्गाचे सक्षमीकरण करून त्यावर प्रवासी वाहतूक करणे सहज शक्य आहे. अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक येतात. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू झाल्यास त्यांची सोय होऊ शकेल.

– प्रवीण ठाकूर, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या