शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांची सध्या राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या सातव्या टप्प्यात काल औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यामधील महालगाव येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभा सुरू असताना या ठिकाणी दगडफेक झाल्याची घटना घडल्याने, सभास्थळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार घडला नाही. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केला आहे.

हेही वाचा – ‘वरळीतून लढून दाखवा,’ आदित्य ठाकरेंच्या खुल्या आव्हानाला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर, जाहीर सभेत म्हणाले “अशी आव्हानं…”

अंबादास दानवेंनी म्हटले आहे की, “आदित्य ठाकरे यांच्या सभेत अडथळे निर्माण करत दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न महालगाव (ता. वैजापूर) येथील सभेदरम्यान झाला. सरकारचे देखील आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. सदर गोंधळ घालणारे मिंधे गटाचे आमदार रमेश बोरणारे यांच्या नावाच्या घोषणा देत होते. आदित्य ठाकरेंच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस अधिक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे.”

याचबरोबर “आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद दौरा सुरू आहे. याच्या सातव्या टप्प्यात आज आम्ही संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव या गावात असताना आणि सभा सुरू असताना, सभेमध्ये एक दगड आला. त्यानंतर सभास्थानावरून आम्ही निघताना सुद्धा तीन-चार दगडं वाहनावर आले. या ठिकाणी मुद्दाम काही समजाकंटक विशेषकरून या भागातील स्थानिक आमदार रमेश बोरनारे यांच्या जिंदाबादच्या घोषणा हा जमाव देत होता. मुद्दाम दलित समाज आणि हिंदू यांच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न या जमावामधील काहीजण करत होते. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येत असताना, अशापद्धतीने काही लोक मुद्दाम या जमावात घुसून वेगळं काम करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही निषेध करतो.” अशा शब्दांमध्ये दानवेंनी टीका केली आहे.

हेही वाचा – एकनाथ शिंंदेंच्या वरळीतील सभेत खुर्च्या रिकाम्याच? राष्ट्रवादीच्या महिला पादधिकाऱ्याने शेअर केला व्हिडीओ; म्हणाल्या, “ना खोके…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे अशाप्रकारे समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरे यांच्या सभा उधळण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षिततेकडेही कमालीचं दुर्लक्ष केलं जात आहे, हे या घटनेवरून दिसून आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये दुर्लक्ष झाले आहे, या ठिकाणचे स्थानिक अधिकारी आणि पोलीस अक्षीक्षक यांच्यावर कारवाईची मागणी शिवसेना करेल.” असंही अंबादास दानवे यांनी ट्वीटरवरील व्हिडीओद्वारे सांगितलं आहे.