scorecardresearch

“…तर अधिवेशन संपण्यापूर्वीच हे सरकार अपात्र ठरेल”, अमोल मिटकरींचं मोठं विधान!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं आहे.

eknath shinde devendra fadnavis amol mitkari
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मार्च महिना संपण्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता घटनातज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी शिंदे गटाच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. यातील अनेक प्रश्नांना शिंदे गटाच्या वकिलांना उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागेल, असा तर्क लावला जात आहेत. दुसरीकडे, निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वास शिंदे गटातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं आहे. कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, तर तुम्हाला या सरकारचे बारा वाजलेले दिसतील. म्हणून ‘ईडी पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ हा आमच्या आंदोलनातला नारा होता. राज्यात आता बळीचं राज्य यायला सुरुवात होईल, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरींनी दिलं. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- “उद्धवजी, ते तुमचा कधी गळा दाबतील, हे…”, अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचं विधान

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “सत्ताधीश हे मदमस्त झाले आहेत. पण अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर हे सरकार तुम्हाला अपात्र झालेलं दिसणार आहे. हे सरकार अल्पावधीचं सरकार आहे.”

हेही वाचा- शिवसेना सोडण्याआधी राज ठाकरेंनी काय मागितलं होतं? मी साक्षीदार आहे म्हणत एकनाथ शिंदेंचं विधान!

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा शिंदे गटाला विश्वास आहे, याबाबत विचारलं असता अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “विश्वास ठेवायला हरकत नाही. पण सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेच्या बाहेर जाता येत नाही. न्यायालयाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागतो. निकाल त्यांच्या बाजुने लागणार असा त्यांना विश्वास असेल तर मग त्यांच्यामध्ये अस्वस्थता का आहे? मंत्रालयातील फाईलींच्या हालचालींना वेग का आलाय? देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे दिसतेय, ही कशाची चिन्हं आहेत. आम्ही अस्वस्थ झालेलो नाहीत. आम्हाला विश्वास आहे. न्यायदेवता अजून जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालय घटनेला छेदून पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असंही अमोल मिटकरी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 14:58 IST

संबंधित बातम्या