खासदारांचा सातबारा
लोकसभेच्या  निवडणुकांचे ढोल-ताशे वाजण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही महिन्यांतच आपले
‘तडफदार आणि लाडके’ उमेदवार मतांचे दान मागण्यासाठी मतदारराजाच्या दारी
येतील. अशा वेळी गेल्या निवडणुकीत आपण ज्यांना निवडून दिले त्यांनी लोकांसाठी नेमके काय केले? पाच वर्षांत विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? त्यांच्याबद्दल मतदारांचे, विरोधकांचे काय म्हणणे आहे? याची पक्की नोंद दर रविवारी.. खासदारांचा
सातबारा मध्ये..
पुढील रविवारी
औरंगाबाद, यवतमाळ

पटेल आणि पटोले पुन्हा आमनेसामने?
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे राज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ. शरद पवार यांचे उजवे हात समजले जात असल्याने राष्ट्रवादीमध्ये जसे त्यांना महत्त्व तसेच काँग्रेसमध्ये १०, जनपथ म्हणजेच सोनिया गांधी यांच्या जवळच्यांमध्ये गणना होत असल्याने काँग्रेसमध्येही त्यांचा शब्द तेवढाच प्रमाण मानला जातो. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात समन्वय राखण्याची जबाबदारी ही पटेल यांच्याकडे असते. ‘बडय़ांचे सारेच बडे’ असे नेहमी म्हटले जाते. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघाबाबत आहे. पटेल यांच्याकडे हवाई वाहतूक हे खाते असताना त्यांनी गोंदियातील विमानतळाचा कायापालट केला तसेच त्यांच्या पुढाकारानेच हवाई प्रशिक्षण संस्था सुरू झाली. अवजड उद्योग खाते येताच त्यांनी ‘भेल’चा प्रकल्प मतदारसंघात आणला. या मतदारसंघात हिंदी भाषकांबरोबरच पोवार, दलित, कुणबी आणि लोधी समाजाचे प्राबल्य आहे. पण पटेल यांनी जातीच्या राजकारणावर मात करीत स्वत:चे प्राबल्य निर्माण केले. भंडारा जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होता. पण गेल्या निवडणुकीत भाजपचे खासदारच तिसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसमधून बाहेर पडलेले आमदार नाना पटोले यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरून पटेल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पुढे पटोले हे भाजपमध्ये गेले आणि आमदार म्हणून निवडून आले. सर्वचदृष्टय़ा ‘भरभक्कम’ असलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्यापुढे टिकाव लागणे कठीण असताना पटोले यांनी मात्र पटेल यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आगामी निवडणुकीत लढण्याची तयारी पटोले यांनी सुरू केली आहे.  
लोकसभा मतदारसंघ : गोंदिया-भंडारा
विद्यमान खासदार : प्रफुल मनोहरभाई पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस<br />मागील निकाल :  नाना पटोले, अपक्ष यांचा पराभव
जनसंपर्क
बहुतांश शनिवार-रविवारी प्रफुल्ल पटेल जातीने सकाळच्या सत्रात गोंदियातील रामनगर येथील बंगल्यात लोकांच्या समस्या ऐकून घेतात. गोंदिया शहरातील पॉल चौकात सी.जे. हाऊस येथे त्यांचे जनसंपर्क कार्यालय असून त्यांचे विश्वासू व आमदार राजेंद्र जैन त्यांच्या अनुपस्थितीत पटेलांच्या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणींची दखल घेतात.
मतदारसंघातील कामगिरी :
*बावनथडी सिंचन प्रकल्प पूर्ण केला.
*गोसीखुर्द प्रकल्पाला राष्टीय प्रकल्प घोषित करवून प्रकल्पासाठी १२०० कोटीच्या पुनर्वसन पॅकेजला मंजुरी मिळवून दिली.
*लाखांदूर येथे साखर कारखान्याची निर्मिती  
*अदानी विद्युतनिर्मिती प्रकल्प पूर्ण, गोंदियात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी
*रोजगार मेळाव्याचे आयोजन करून मतदारसंघातील हजारो बेरोजगारांना नोकरीची संधी
पटेलांची हवा-हवाई..
हवाई वाहतूकमंत्री म्हणून देशातील विमान सेवेचा चेहरामोहरा बदलण्याबरोबरच ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे श्रेय प्रफुल्ल पटेल यांना जात असले तरी त्याच वेळी सरकारी विमान कंपन्यांची हेळसांड तर खासगी कंपन्यांना झुकते माप दिल्याबद्दल पटेल हे तेवढेच टिकेचे धनी ठरले. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या शहरांमधील विमानतळांचा खासगीकरणातून विकास पटेल यांच्या पुढाकारानेच झाला. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण करण्यात आले, पण यातही घोळ घालण्यात आला. किंगफिशरचे लाड पटेल यांच्या काळातच झाले.
औद्योगिकीकरणाचा धडाका
अदानी, व्हिडिओकॉन, भेलसारखे उद्योग आणून औद्योगिकीकरणाची नवी दिशा मतदारसंघाला दाखविली. विविध उपसा सिंचन योजनांना निधी मिळवून दिला. महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ-एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सपेस, सारनाथ एक्सप्रेस गोंदियापर्यंत खेचून आणल्या. रूग्णांना मनोहरभाई पटेल अकादमीतर्फे व पंतप्रधान निधीतून आíथक मदत मदत मिळवून दिली.  – प्रफुल्ल पटेल
धान उत्पादकांसाठी काय केले?
प्रफुल्ल पटेलांना धानाचे साधे हमीभावदेखील वाढवून घेता आलेले नाहीत. जिल्हयात रोजगारांची वानवाच आहे. धापेवाडा टप्पा-२ चे पाणी  अदानी प्रकल्पाला दिले जात आहे. नऊ तालुक्यांतील शेतकरी तहानलेले आहेत. पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत गेल्या ५ वर्षांत एकही रस्ता गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ात करता आलेला नाही.  
नाना पटोले, भाजप