Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत अकरा फेऱ्यांची मतमोजणी झाली आहे. यामध्ये शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके या जरी अपेक्षेप्रमाणे आघाडीवर असल्या तरीही ‘नोटा’ने अपक्ष उमेदवारांना पिछाडीवर टाकत धक्कादायकरित्या मतं मिळवली आहेत. मतमोजणीच्या अकराव्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना ४२ हजार ३४३ मतं मिळाली आहेत. तर नोटाला ८ हजार ३७९ मतं मिळालेली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज केलेली एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Andheri Bypoll Election Result 2022 Live : ऋतुजा लटके विजयी, तर अपक्षांना मागे टाकत ‘नोटा’ दुसऱ्या क्रमांकावर

‘मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार…अंधेरीच्या मतदानात नोटांचा पाऊस लोकशाही प्रधान देशात अवघड आहे.’ असं वसंत मोरे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.

या मतमोजणीत नोटा या पर्यायाचा किती जण वापर करतात या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विरोधकांनी मतदारसंघात नोटा या पर्यायाचा प्रचार केला होता असा आरोप शिवसेनेने केला होता.

हेही वाचा – राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत उद्धव ठाकरेंच्या भाकीतावर आशिष शेलारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे ३०० अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात आहेत. तसेच २० सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजर आहेत.