अलिबाग : कोकणातील एक देवस्थान असे आहे जिथे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते. ब्रिटीश काळापासून ही पंरपरा सुरु असल्याचे सांगितले जाते.
सशस्त्र जवानांकडून देवस्थानाला मानवंदना देण्याची प्रथा देशात फारशी आढळून येत नाही. मात्र रायगड जिल्ह्यातील रोहा येथील धावीर देवस्थानला दरवर्षी पोलीसांकडून सशस्त्र सलामी दिली जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पालखी सोहळ्यापूर्वी धावीर महाराजांना ही सलामी दिली जाते. सालाबादप्रमाणे धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि पोलीस अधीक्षक आँचल दलाल उपस्थित होत्या. पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिल्यानंतर पालखी सोहळ्याची सुरुवात झाली.
पालखी सोहळा पाहण्यासाठी गर्दी
ब्रिटीशांच्या काळापासून धावीर महाराज देवस्थानास पोलिसांची सशस्त्र मानवंदना देण्याचा बहुमान दिला आहे. तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नरने ही मानवंदना देण्याची प्रथा सुरू केल्याचे सांगीतले जाते. तसे जुने दाखलेही आढळतात. ही प्रथा नेमकशी कशी सुरू झाली याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. पण मध्यंतरी महाराष्ट्र सरकारने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री बी. एल. पाटील यांच्या प्रयत्नाने ही मानवंदना पुन्हा सुरू झाली. देवस्थानाला दिली जाणारी पोलिस वंदना हे देवस्थानाचे वैशिष्ट्य मानले जाते. मानवंदना स्वीकारल्यानंतर देवळामधून निघालेली पालखी संपूर्ण गावामधून फिरते.
सशस्त्र मानवंदनेनंतर पहाटे धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होते. ढोल-ताशांच्या गजरात मार्गस्थ झालेल्या पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी फुलांची सजावट, सुबक रांगोळ्या काढल्या जातात. विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी वातावरणात वेगळेच चैतन्य संचारते. महाराजांची पालखी ग्रामस्थांना दर्शन देत दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात परतते. यावेळी पुन्हा महाराजांना पोलिस मानवंदना देण्यात येते. रोहा शहराचे ग्रामदैवत म्हणूनही हे देवस्थान ओळखले जाते.
रोहा येथील बळवंतराव विठोजी मोरे यांनी आपल्या पाच भावांच्या सहाय्याने शके १७६९ माघ शुद्ध १३ रोजी मंदिर बांधण्यास सुरुवात केली. हे काम शके १७७० म्हणजे १८४९ मध्ये पूर्ण झाल्यावर धावीर महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली; परंतु हे मंदिर लाकडाचे असल्याने त्याला वाळवी लागली. त्यानंतर आठ वर्षांनी लोकवर्गणीतून मंदिर बांधण्यात आले. १९९४ रोजी स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पुढाकाराने देवस्थानचे नूतनीकरण करण्यात आले.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ धावीर महाराजांचा रक्षक चेडा याचे स्थान आहे. गाभाऱ्यामध्ये धावीर महाराजांच्या डाव्या बाजूस देवी काळकाई, उजव्या बाजूस बहिरी बोवा महाराज, मागे तीन वीर व कोपऱ्यामध्ये वाघ बाप्पा अशी अशी देवांची स्थाने आहेत. देवस्थानात नवरात्रोत्सव दररोज गोंधळी लोकांकडून कीर्तन, गोंधळ, भजन आदी कार्यक्रम होत असतात.