सांगली : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी दिली. त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख जप्त करण्यात आले आहेत.
स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना मंगळवारी सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावले.अशोक रेड्डी याच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या टैळीने सोन्याचे बिस्किट दाखवून विश्वास संपादन केला. २५ लाख रुपये घेतले, मात्र सोने न देता पोलीस आल्याचे सांगत पोबारा केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तातडीने सातारा पोलीसांना कळवण्यात आले. संशयित पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगितले.
भुईंज पोलीसांनी आणेवाडी येथे नाकाबंदी केली. जीपमधून ( एमएच १२ पीझेड ७९९२) जात असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता लुटीतील साडेबारा लाख रुपये मिळाले. यातील संशयित प्रशांत निंबाळकर (वय ४८, रा. नांदूर, जि. बुलढाणा), प्रवीण खिराडे (वय ३७, रा. खामगाव, जि. बुलढाणा), मानसी शिंदे व नम्रता शिंदे (दोघी रा. सारोळा, ता.मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. लुटीतील उर्वरीत रक्कम हस्तगत करण्याचे व टोळीतील अन्य संशयितांना पकडण्याचे पोलीसांचे प्रयत्न सुरु आहेत.