शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतीस, यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत. तसेच, पक्षांतर हा नार्वेकरांना छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे, अशी टीकाही राऊतांनी नार्वेकरांवर केली.
संजय राऊत म्हणाले, “ज्याला लोकशाहीची चाड आणि पक्षांतराविषयी राग नाही. पक्षांतर हा त्यांचा छंद आहे. अशा व्यक्तिला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवत शिवसेनेच्याबाबत हवे ते निर्णय घेतले जातात. पण, इतिहासात तुमची नोंद काळ्या कुट्ट अक्षरात होईल. भविष्यात रस्त्यावर फिरणं मुश्किल होणार आहे. ही मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही,” असा इशारा संजय राऊतांनी नार्वेकरांना दिला आहे. याला मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा : ‘सिल्व्हर ओक’वरील महाविकास आघाडीच्या बैठकीत काय चर्चा झाली? जयंत पाटील माहिती देत म्हणाले…
“संजय राऊतांनी मर्यादीत राहावं”
“संजय राऊतांनी दाखवण्याची भाषा करू नये. राज्य लोकशाही मूल्य आणि संविधानावर चालतं आहे. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. लोकशाहीत अशा धमक्यांना कोणतेही स्थान नाही. संजय राऊतांनी मर्यादित राहत, आपल्या उंची एवढंच बोलावं,” असं आशीष शेलार यांनी म्हटलं.
“राऊतांना काय करायचं ते करावं”
भाजपा आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. “जे नियमात आणि कायद्याच्या चौकटीत आहे ते होईल. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तीन महिन्यांत निर्णय घ्या, असे आदेश आले नाहीत. कायद्याच्या अनुसरून राहुल नार्वेकर निर्णय घेतील. राऊतांना काय करायचं ते करावं,” असं नितेश राणेंनी सांगितलं आहे.