नांदेड : ‘वनवास’ शब्दप्रयोगावरुन चौफेर टीका झाल्यानंतर भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी आता सारवासारव केली असून मी कोण्या पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव घेतले नव्हते, असे स्पष्टीकरण गुरुवारी येथे दिले.
लातूर येथे गेल्या रविवारी झालेल्या भाजपाच्या कार्यक्रमात बोलताना चव्हाण यांनी आपल्या या पक्षप्रवेशाची कहाणी सांगताना, २०१० साली मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर पुढच्या १४ वर्षांचे वर्णन करताना वनवास भोगावा लागल्याचे विधान केले होते. सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये वरील वक्तव्य प्रसृत झाल्यानंतर नांदेडचे काँग्रेस खासदार प्रा.रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी चव्हाण पिता-पुत्रांच्या सत्ताकाळाचा हिशेब जनतेसमोर मांडला.
त्यावर चार दिवस मौन बाळगल्यानंतर गुरुवारी येथे झालेल्या वार्ताहर बैठकीमध्ये चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. लातूरच्या भाषणात वनवासासंदर्भात कोण्या पक्षाचे अथवा व्यक्तीचे नाव घेतले नाही. राज्यसभेमध्ये बोलताना काँग्रेसकडून मिळालेल्या संधीचा उल्लेख केला होता, याकडे चव्हाण यांनी सर्वांचे लक्ष वेधले. माझ्या वक्तव्यामध्ये शंकरराव चव्हाण यांना कशासाठी ओढता, असा सवाल त्यांनी टीका करणार्यांना विचारला.
दरम्यान ‘निर्भय बनो चळवळी’ने चव्हाण यांचा वनवासकालीन प्रवास मांडला आहे. २०१४ ते २०१९ काँग्रेसतर्फे लोकसीेत याच कालावधीत पत्नी महाराष्ट्र विधानसभेत आमदार, २०१५ ते २०१९ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद, २०१९ ते २०२२ ठाकरे मंत्रिमंडळात महत्त्वाचे मंत्रीपद, २०२३-२०२४ दरम्यान काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत स्थान.
लाडक्या पक्षात गेल्यानंतर चव्हाण यांना राज्यसभेत खासदार करण्यात आले आणि त्यांच्या कन्येला आमदारकी देण्यात आली. काँग्रेसने त्यांना ३५व्या वर्षी प्रथम राज्यमंत्री आणि पुढे ५०व्या वर्षी मुख्यमंत्री केले, याकडे ‘निर्भय बनो’ने लक्ष वेधले आहे.
अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेस आणि इतरांकडून टीका होत असताना, भाजपातील जुन्या विा नव्या कार्यकर्त्यांकडून कोणीही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले नाही. खा.रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासंदर्भात भाजपातील एकाने चाचपणी केली; पण ते जमले नाही. शेवटी खा.अशोक चव्हाण यांनीच स्पष्टीकरण देत या विषयावर पडदा टाकला आहे.