Atulbaba Bhosale on Ministry : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयानंतर अतुल भोसले यांनी आज महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतरावांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, “कराडच्या विकासासाठी मतदारसंघातील अडीअडचणी सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहीन. महायुती सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमधील जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडेन”.

दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातील अवघड लढतीबद्दल प्रश्न विचारला असता अतुल भोसले म्हणाले, “कराडमधील जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय ते प्रेम स्वीकारत असताना लढत कठीण आहे की सोपी याकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही”. अतुल भोसले हे एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”

मंत्रिपदाबाबत अतुल भोसले काय म्हणाले?

अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. नुकतीच त्यांनी फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. या भेटीबद्दल अतुल भोसले म्हणाले, “फडणवीसांनी माझं अभिनंदन केलं आहे. तसेच कराडकरांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा मला सल्ला दिला आहे”. दरम्यान, यावेळी त्यांना विचारण्यात आलं की एवढ्या मोठ्या नेत्याला पाडल्याचं महायुतीकडून किंवा भाजपाकडून बक्षीस मिळणार का? एखाद्या मंत्रिपदी वर्णी लागणार का? त्यावर अतुल भोसले म्हणाले, “कराडच्या जनतेने मला स्वीकारलं हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. त्यांच्या प्रेमाचं मी आता चीज करणार आहे”. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अतुल भोसले यांनी प्रीतीसंगमावर जाऊन यशवंतरावांना अभिवादन केलं होतं.

हे ही वाचा >> विधानसभेतील पराभवानंतर दोन्ही ठाकरे एकत्र येणार? राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “महाराष्ट्र व मुंबईसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वीराज चव्हाणांविरोधात मोठा विजय

कडार दक्षिण मतदारसंघात अतुल भोसले यांना १,३९,५०५ मतं मिळाली आहेत. तर पृथ्वीराज चव्हाण यांना १,००,१०५ मतं मिळाली आहेत. याआधीच्या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये (२०१४ व २०१९) पृथ्वीराज चव्हाण यांनी अतुल भोसले यांचा पराभव केला होता. मात्र, यंदा त्यांनी कराडमध्ये कमळ फुलवलं. या विजयासह कराड दक्षिणमध्ये भारतीय जनता पार्टीचा अधिकृत प्रवेश झाला आहे.