Avinash Jadhav on Raj and Uddhav Thackeray TMC Election : “दोन ठाकरे बंधूंची (उद्धव ठाकरे व राज ठाकरे) युती पक्की आहे”, असा दावा शिवसेनेचे (उबाठा) राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी केला होता. पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी देखील यासंबंधी सूचक वक्तव्य केलं आहे. दोन्ही पक्षांनी ठाण्यात एकत्र काम सुरू केलं असल्याचं जाधव यांनी सांगितलं. ते म्हणाले, “स्थानिकांच्या प्रश्नांसाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते सातत्याने रस्त्यावर उतरलेले दिसतील. निवडणुका एकत्र लढण्याबाबत राज ठाकरे ठरवतील.”
शिवसेना (उबाठा) व आम्ही (मनसे) एकत्र काम सुरू केलं आहे. ठाणे महानगरपालिकेत आमची मोर्चेबंधणी चालू आहे. शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिकांनी एकत्र येत ठाण्यात अलीकडेच एक मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला देखील मोठ्या प्रमाणात यश मिळालं. लोकांचा पाठिंबा मिळाला. आम्ही मनपा अधिकाऱ्याच्या बदलीची मागणी केली होती. सरकारला आमच्यासमोर झुकावं लागलं आणि त्या अधिकाऱ्याची बदली करावी लागली. अशाच प्रकारे लोकहिताच्या कामांसाठी शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यावर एकत्र दिसतील.”
शिवसेना (उबाठा) व मनसेची युती होणार?
दरम्यान, शिवसेना (उबाठा) व मनसेच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारल्यावर अविनाश जाधव म्हणाले, “युती व आघाडीचा निर्णय राज ठाकरे घेतील. राज ठाकरे जो आदेश देतील तिथे आम्ही जाऊ. आता या क्षणाला काम सुरू केलेलं आहे.”
“भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने ठाण्यात अराजकता माजवली आहे. त्याविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येणं गरजेचे होतं. ठाण्यात भितीचं वातावरण आहे, दहशतीचा वातावरण आहे, भ्रष्टाचार वाढला आहे. आमच्या ठाणे जिल्ह्याकडे आज भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जात आहे. या सगळ्या गोष्टी आम्हाला पुसायच्या असतील, तर आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही काम सुरू केलेलं आहे. निवडणुकीला कसं एकत्र यायचं हे राज ठाकरे सांगतील.”
“…तर शिंदे गटाचं व भाजपाचं पानिपत होईल”
अविनाश जाधव म्हणाले, “ठाण्यात भाजपा व शिंदे गट एकत्र लढेल. कारण ते वेगवेगळे लढले तर त्यांचं पानिपत होईल हे त्यांना माहिती आहे. एकत्र लढले तरी आम्ही त्यांना पराभूत करू.”