Bachchu Kadu on Chhatrapati Sambhaji Maharaj: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या काही दिवसांपासून यात्रा काढत आक्रमक पवित्रा घेतलेल्या बच्चू कडूंनी आता काही वादग्रस्त विधाने केली आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेत बोलत असताना त्यांनी आमदारांना कापून टाका, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. तसेच वतनदारी बंद केली म्हणून सासऱ्यांनीच छत्रपती संभाजी महाराजांना मारले, असा उल्लेख बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात केला. त्यांच्या दोन्ही विधानावर आता वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.

बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले, “पूर्वी वतनदारी चालत होती. त्यातून निजामशाही, आदिलशाही चालत होती. ही वतनदारी बंद केल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले. नाव औरंगजेबाचे घेतले गेले. राजा असा हवा. तो मरण पत्करायला तयार झाला. पण त्यांनी सासऱ्याला वतन दिले नाही.”

भर दिवाळीच्या सणात ही वेदनेची, दुःखाची परिषद आहे, असे सांगून बच्चू कडू म्हणाले, कोणतीही लढाई विचारांनी मोठी होत असते. विचार मजबूत असतील तर ते लोक त्यांचे प्रश्न सोडवू शकतात. जर विचारच नसतील तर नुसते नारे देऊन काही होत नाही. महापुरूषांनी विचारांची लढाई सुरू केली होती. आज राज्यात नेमकी विचारांची लढाई बंद झाली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आम्ही राजकीय लोक तुम्हाला (शेतकऱ्यांना) जाती-पातीच्या वादात अडकवून ठेवू. पण शेतकऱ्यांनी त्यांची हित कशात आहे, हे पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांना आज कमी भावात सोयाबीन विकावे लागत आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो पण शेतकरी आंदोलनाकडे पाठ फिरवतात. शेतकरी जर अन्याय सहन करण्यासाठी तयार असतील तर त्यांनी तसे जाहीर करून टाकावे, अशीही व्यथा बच्चू कडू यांनी बोलून दाखवली.

आतापर्यंत चार कलेक्टर आडवे केले

आंदोलनाबद्दल बोलत असताना बच्चू कडू म्हणाले, “मी आजवर ३५० हून अधिक आंदोलने केली आहेत. मी किमान चार कलेक्टर आडवे केले. तीन सचिव मंत्रालयात फोडले. काय फरक पडला? आणि फरक पडला तरी काय? पण शेतकऱ्यांमधील हिंमत गेली कुठे? तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना लाज वाटली पाहिजे.”

आत्महत्या करण्याऐवजी एखाद्या आमदाराला कापून टाका

“माजी शेतकरी नेते शरद जोषी यांनी शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान केले. त्यांची कोणती जात होती, हे मी सांगणार नाही. पण त्यांनी स्वतः शेती केली. त्यांची राखरांगोळी झाली. पत्नीने आत्महत्या केली आणि हिंगणघाटमध्ये शेतकऱ्यांनीच त्यांना निवडणुकीत पाडले. मलाही शेतकऱ्यांनीच पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत केले गेले. शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे”, असे विधान बच्चू कडू यांनी केले.

बच्चू कडू यांचे स्पष्टीकरण…

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर वाद निर्माण झाल्यानंतर आज बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, वतनदारी शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती. ती लुटीचे तंत्र होते. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी वतनदारी बंद केली. सासऱ्यांनी वतनादारी मागितली तरी संभाजीराजेंनी ती दिली नाही. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या हालचालीची खबर औरंगजेबाला देण्याचे काम सासरच्या मंडळींनी केले, हा इतिहास आहे, असे बच्चू कडू म्हणाले.