अलिबाग : किल्ले रायगडावर साजरा होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभुमीवर मुंबई गोवा महामार्ग आणि वाकण खोपोली मार्गावरील अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बाबतचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किल्ले रायगडावर ३५० शिवराज्याभिषेक सोहळा १ जून ते ७ जून या कालावधीत संपन्न होणार आहे. या निमित्ताने गडावर विवीध सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातील विवीध भागातून मोठ्या संख्येनी शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने अनेक ठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गडावर दाखल होणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने मुंबई गोवा महामार्गावरील तसेच वाकण पाली खोपोली मार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे.

हेही वाचा… रायगड : ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी सज्ज; प्रशासकीय तयारी पूर्ण

दिनांक ३१ मे ला रात्री १२ वाजेपासून २ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत तर ४ जूनला रात्री १२ वाजेपासून ते ६ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत महामार्गावरून १६ टन आणि त्याहून अधिक क्षमतेचे ट्रक, कंटेनर, मल्टी अँक्सल व्हेईकल, ट्रेलर्स, रेती आणि खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा… Maharashtra Breaking News Live: एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेला गट लाचार-संजय राऊत

दूध, इंधन, गॅस, औषध पुरवठा, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर रस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू नसणार असल्याचे शासन आदेशात नमुद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on hevay vehiles transport wakan khopoli route at konkan due to the shivrajyabhishek programe asj
First published on: 31-05-2023 at 18:48 IST