बीड : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला असून, २९ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई तालुक्यांना बसला. बीड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. शिरूरमधील काही गावांमधील शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले, तर अनेकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचे पाणी शिरल्याने नुकसान झाले.

शिरूर कासार तालुक्यातील शिरापूर येथे ७ नागरिकांना, गेवराईमधील पिंपळगाव कानडा येथे २४ नागरिकांना, बीड तालुक्यामध्ये नांदूर हवेली येथे ५ नागरिकांना पुरा बाहेर काढले. तर गेवराई तालुक्यातील भुजगाव येथे पुरामध्ये अडकलेल्या महिलेसाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले होते. पाटोदा तालुक्यातील वनवेवाडी शेंडेवस्ती येथील बाजार तलाव फुटण्याच्या भीतीने गावातील ५० नागरिक डोंगर माथ्यावर जाऊन बसले होते. त्या नागरिकांना पुन्हा सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा येथील २५ नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत तर पाटोदा शहरातील ४५ नागरिकांना तहसील कार्यालय सभागृहात स्थलांतरित केल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

अतिवृष्टीने निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरही दिसून आले असून, वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या भागातील पुराचा आढावा घेतला. शिरूर तालुक्यात अचानक आलेल्या पुरामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने नागरिक हतबल झालेले पाहायला मिळाले. काही दिवसाखाली कडा नदीने रौद्ररूप दाखवले. पुन्हा शिरूर तालुक्यातील सवसवाडी, वाटळी जाटनांदुर,उखळवाडी शिवारात खरिपाचे पीक भुईसपाट झाले. आष्टी तालुक्यातील वनवेवाडी, मोराळा येथे रात्री पडलेल्या पावसाने शेतीतील माती खरडून गेली. या भागातील विहिरीही खचल्या. आठवडाभरातच दुसऱ्यांदा ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावित झाले.

माजलगाव, मांजरा धरणातून नदीपात्रात विसर्ग

माजलगाव धरणातील पाण्याची आवक पाहता सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. माजलगाव धरणाचे अकरा वक्री दरवाजे सध्या उघडण्यात आले असून सिंदफणा नदीपात्रात ८८ हजार ५९४.७७ क्युसेक इतका विसर्ग केला जात आहे. यामुळे सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाचे एकूण सहा वक्री दरवाजे उघडण्यात आले. मांजरा नदीपात्रात २७ हजार १६६.८० क्यूसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. रविवारी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले होते. सोमवारी आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले. मांजरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या गावांचा संपर्क तुटला

बीड तालुक्यातील आहेर चिंचोली, शिरूर कासार तालुक्यातील ब्रम्हनाथ येळंब, डोंगरकिन्ही या गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने या गावचा संपर्क काही काळ तुटला होता. तर बीड तालुक्यातील बोरखेड ते शिंदेवस्ती, शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा ते डोंगर किन्ही, रायमोहा ते येवलवाडी दरम्यानचे पूल वाहून गेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.