राहाता : गोवंशीय जनावरांचा कत्तलखाना चालवणाऱ्या ममदापूर येथील एका टोळीला पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार केले आहे. अशा स्वरूपाची ही त्यांची सलग तिसरी कारवाई आहे.

ममदापूरचा टोळीप्रमुख नियाज अहमद फकीरमहंमद शेख (कुरेशी, वय ४०) व टोळीतील सदस्य सद्दाम फकीरमहंमद शेख (कुरेशी, वय ३०), जकरीया शब्बीर कुरेशी (वय ३२), वसीम हनिफ कुरेशी (वय २८), कैफ रऊफ कुरेशी (वय २४) आणि अरबाज अल्ताफ कुरेशी (वय २४) लोणी आणि राहाता येथे सक्रिय होती. त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक व कत्तल करणे असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. या टोळीच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्यामुळे त्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत होती.

या टोळीच्या कृत्यांना पायबंद घालण्यासाठी लोणी पोलिसांनी, टोळीला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून शिफारस केली. या टोळीवर एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी टोळीप्रमुख आणि त्याच्या सर्व सदस्यांना नगर जिल्ह्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला.

यापुढेही कारवाई सुरू राहणार

जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कठोर पावले उचलली आहेत. शरीराविरुद्ध, मालाविरुद्ध, गोवंशीय आणि भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात येणार आहे. – सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर.

ममदापूर येथे सर्रासपणे गोवंश जनावरांची कत्तल होते. अनेक वेळा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी कारवाया करून गोवंशाची सुटका करून आरोपींवर कारवाई केली. लोणी पोलिसांच्या या अकार्यक्षमतेबाबत हिंदुत्ववादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोणी पोलिसांना अवैध धंद्यांबाबत माहिती असतानाही ते कारवाई करण्यास का धजावत नाहीत, असा प्रश्न आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या लोणी गावात देशी व विदेशी मद्य व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही हे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याने महाविद्यालयीन तरुण नशेच्या आहारी जात आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळेश्वर, कोल्हार, दाढ, प्रवरानगर या ठिकाणी सर्रासपणे अवैध व्यवसाय सुरू आहे. या अवैध व्यावसायिकांना पाठबळ देणाऱ्या लोणी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करावी. – गोरक्ष गवारे, लोकसंग्राम परिषद, अध्यक्ष, बाभळेश्वर.