कोल्हापुरात आचारसंहिता अंमलबजावणीस सुरुवात

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बुधवारी त्याचे दृश्य परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आदी ठिकाणची पदाधिकाऱ्यांची वाहने शासकीय यंत्रणेकडे जमा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने बुधवारी त्याचे दृश्य परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती आदी ठिकाणची पदाधिकाऱ्यांची वाहने शासकीय यंत्रणेकडे जमा करण्यात आली. कोल्हापूर महापालिकेने राजकीय पक्ष व नेत्यांनी उभारलेले अनधिकृत फ्लेक्स काढण्याची मोहीम आजपासून राबवण्यास सुरुवात केली. परवानगी न घेता प्रचारास सुरुवात केलेल्या धनंजय महाडिक व संजय मंडलिक या दोघा उमेदवारांना यापुढे रीतसर परवानगी घेऊन सभा-बैठका पार पाडाव्या लागणार आहेत. शिवाय त्याचा खर्चही निवडणूक यंत्रणेकडे द्यावा लागणार आहे.    
गेल्या तीन-चार महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणुका नेमक्या कधी होणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. बुधवारी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांसह अन्य तपशील जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्या पत्रकार परिषदेकडे राजकीय नेत्यांनी मोर्चा वळविला होता. कोल्हापूर व हातकणंगले या जिल्हय़ातील दोन लोकसभा मतदारसंघांत १७ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर त्यासंदर्भातील चर्चेला ऊत आला होता. मतदानाची तारीख समजल्यामुळे आघाडी व महायुतीकडून नियोजनाला सुरुवात झाली आहे. या आठवडय़ात व्यापक बैठक घेऊन नियोजनाचा अंतिम आराखडा तयार केला जाणार असून त्याबरहुकूम प्रचार यंत्रणा राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येते.     
आचारसंहिता लागू झाल्याने त्याचा पहिला फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना बसला. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची आठ वाहने शासकीय यंत्रणेकडे जमा करण्यात आली. जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या बाबतीतही हाच अनुभव आला. बुधवारी जिल्हा परिषदेत प्रमुख पदाधिकारी फिरकले नसल्याने तेथे नेहमीची गर्दी जाणवत नव्हती. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राजकीय पक्षांकडून डिजिटल फ्लेक्स उभारण्याचे पेवच फुटले होते. शहरातील सर्व मध्यवर्ती चौकांत धनंजय महाडिक यांनी रातोरात फलक उभारले होते. त्यावर सतेज पाटील यांचे छायाचित्र नसल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांच्या छायाचित्रासह आणखी फलक लावण्यात आले. संजय मंडलिक यांच्या शिवसेना प्रवेशानंतर शहरात प्रथमच आगमन झाले तेव्हाही जागोजागी फलक झळकले होते. अवघे दोन दिवस लावण्यात आलेले हे फलक आचारसंहिता अंमल सुरू झाल्याने लगेचच काढून टाकण्यात आले. ज्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून फलक उतरवले गेले नाहीत ते काढून टाकण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली असल्याची माहिती सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांनी दिली.
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beginning of the code of conduct implementation in kolhapur

ताज्या बातम्या