राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थिर होतंय असं वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारमध्ये प्रवेश झाला आहे. त्यामुळे रायगडमधील राजकारण ढवळून निघायला सुरूवात झाली आहे. पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात संघर्षांची ठिणगी पडली असल्याचं सध्या दिसत आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाईल अशी शक्यता वर्तवल्यापासूनच जिल्ह्यातून विरोध सुरू झाला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सर्वाधिक विरोध होत आहे.
रायगड जिल्ह्यातील शिवसेना भाजपच्या सर्व आमदारांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शवला असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. गोगावले यांनी आज (१२ जुलै) पुन्हा एकदा त्यांचं मत मांडलं. ते काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बोलत होते. यावेळी गोगावले यांना प्रश्न विचारण्यात आला की, आदिती तटकरे यांनी याआधी पालकमंत्री म्हणून चांगलं काम केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ही संधी द्यायला हवी, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत, यावर तुमचं मत काय? या प्रश्नावर गोगावले म्हणाले, त्यांनी चांगलं काम केलं असेल तर आम्ही काय वाईट काम करणार आहोत का? आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं काम करू.
हे ही वाचा >> राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांकडून अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी, आता सांभाळणार ‘हे’ पद
आमदार भरत गोगावले म्हणाले, पालकमंत्री म्हणून त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) अधिक चांगलं काम करू. कारण महिला आणि पुरूष यामध्ये थोडासा फरक येतोच ना. आम्हाला गेल्या १५ वर्षांचा आमदारकीचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ आणि काम करू. रायगडमधल्या सहाच्या सहा आमदारांची, आम्हा सगळ्यांची एकच मागणी आहे की, रायगडचा पालकमंत्री हा भरतशेट असला पाहिजे. आमची ही मागणी शेवटपर्यंत, अगदी शेवटच्या टोकापर्यंत राहील.