पंढरपूर : नीरा खोरे आणि भीमा खोऱ्यामध्ये पाऊस सुरू असल्याने उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणत पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत ५१ हजार ६०० क्युसेक तर वीर धरणातून २३ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी आज म्हणजे सोमवारी पंढरपूर येथील भीमा नदीला पोहचणार आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्हा आणि उजनी धरण लाभक्षेत्रात सध्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यामुळे अनेक धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात आलेले पाणी उजनी धरणात मिसळत आहे. उजनी धरण हे ९७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणात पाणी साठवण क्षमता संपत आल्याने उजनीतून नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ३० हजार क्युसेक पाणी सोडले होते. मात्र, पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणारे पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता ५१ हजार ६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर उजनी धरणात येणारे पाणी ४१ हजार ६८८ क्युसेक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे वीर धरणातून २३ हजार क्युसेक पाणी नीरा नदीला सोडण्यात आले आहे. हे पाणी अकलूज जवळील भीमा नदीच्या संगमाला येऊन मिसळते. त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. उजनी आणि वीर धरणाचे पाणी हे येथील भीमा नदीला सोमवारी पोहोचणार आहे. त्यामुळे भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार आहे. दरम्यान, नीरा व भीमा नदीवरील सर्व कोल्हापूर बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.