​सावंतवाडी : संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी, नवी दिल्ली यांच्या अधिकृत मान्यतेने कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित ‘भोसले सैनिक स्कूल’, चराठे (सावंतवाडी) या संस्थेला ही ऐतिहासिक मान्यता प्राप्त झाली आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) मॉडेलवर आधारित, कोकणातील हे पहिले सैनिक स्कूल तसेच पहिले सहशिक्षणात्मक (Co-educational) सैनिक स्कूल ठरणार आहे.

​आज आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अच्युत सावंत भोसले यांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती माध्यमांना दिली. देशभरात सैनिकी शिक्षणाच्या वाढत्या मागणीनुसार केंद्र सरकारने नुकत्याच ६९ नवीन सैनिक स्कूल्सना मान्यता दिली आहे, ज्यामुळे देशभरात सुमारे ९,६१७ अतिरिक्त प्रवेश जागा निर्माण होणार आहेत. ‘भोसले सैनिक स्कूल’चा मुख्य हेतू ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर, राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.

प्रवेश प्रक्रिया आणि क्षमता

​प्रवेश: All India Sainik School Entrance Examination (AISSEE) द्वारे.दरवर्षी सहावी आणि नववी इयत्तेत प्रवेश दिला जाईल.​प्रवेश क्षमता एकूण १६० विद्यार्थी, त्यापैकी ४० जागा विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, मुलींना समान दर्जाचे सैनिकी प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती आणि नेतृत्त्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे.

सावंतवाडी – ​चराठे येथील भोसले नॉलेज सिटी परिसरात बारा एकर क्षेत्रावर हे विद्यालय उभारले जात आहे. येथे अत्याधुनिक शिक्षणासोबतच सैनिकी प्रशिक्षण, शिस्तबद्ध जीवनशैली, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा संगम साधला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, धाडस, आत्मविश्वास, स्वावलंबन, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित करणे, हे या शाळेचे ध्येय आहे.

​श्री. अच्युत सावंत भोसले यांनी सांगितले की, या शाळेमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणासाठी दूरवर जाण्याची गरज उरणार नाही. स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि इतर संरक्षण सेवांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या मोठ्या संधी प्राप्त होतील. भोसले सैनिक स्कूलचा कॅम्पस अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज केला जात आहे, ज्यात शैक्षणिक इमारती, ट्रेनिंग ब्लॉक्स, हॉस्टेल्स, ड्रिल ग्राउंड आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांचा समावेश आहे.

​उद्घाटन समारंभ येत्या शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे, त्यानंतर औपचारिक प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. ऑनलाईन नोंदणी बाबत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रत्नेश सिन्हा यांनी माहिती दिली की, प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना उद्या (९ नोव्हेंबर) पर्यंत नोंदणी करता येईल. ‘भोसले सैनिक स्कूल’ हे केवळ एक शैक्षणिक केंद्र नसून “भविष्यातील सैन्य अधिकारी आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे ध्येयस्थान” आहे. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीने कोकण आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात एक नवे सुवर्णपान लिहिले आहे, असे प्रतिपादन कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी केले.