दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली :  गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या सोनेखरेदीला गेल्या काही दिवसात वेगाने वधारलेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. दरवर्षी मुहूर्तावर खरेदी केल्या जाणाऱ्या चोख सोन्याच्या (वेढणी) व्यवहारात मोठी घट आल्याचे राज्यात प्रसिद्ध सांगली सराफ बाजारात पाहण्यास मिळाले आहे. या दरवाढीमुळे चोख सोन्याच्या खरेदी विक्रीत वीस ते तीस टक्के घट झाली आहे.

गेल्या आठ दिवसापासून सोन्याच्या दरात वेगाने मोठी वाढ झाली असून याचा परिणाम या चोख सोने खरेदीवर झाला. गुढीपाडव्यावेळी मुहूर्तावर गुंतवणूक म्हणून हे चोख सोने (वेढणी) खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या गेल्या दोन दिवसांपासून घटली आहे. केवळ लग्नसराईसाठी गरज असणाऱ्यांनीच  दागिन्यांची खरेदी आजच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात केली.  दरवाढीमुळे वीस ते तीस टक्के खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे.

आज सांगली बाजारात सोन्याचा प्रतितोळा दर ६० हजार ७०० रुपये अधिक जीएसटी असा होता, तर चांदीचा दर किलोला ६८ हजार ५०० रुपये अधिक जीएसटी असा होता. या वाढलेल्या दरामुळे गुंतवणूक म्हणून चोख सोने खरेदीवर याचा परिणाम झाल्याचे सांगली सराफ असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र पेंडुरकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसात सोन्याच्या वधारलेल्या दराचा यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीविक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. बाजारात केवळ ज्यांना गरज आहे अशाच दागिने हव्या असणाऱ्या ग्राहकांनी आज सोने खरेदी केली. मात्र मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या चोख सोन्याच्या खरेदी विक्रीत या दरवाढीमुळे तब्बल वीस ते तीस टक्के घट झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– जितेंद्र पेंडुरकर अध्यक्ष, सांगली सराफ असोसिएशन.