मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं असून भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आहे? उगाच टिमकी वाजवायची नाही अशा शब्दांत सुनावलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मुंबईचं ग्रामदैवत असलेल्या मुंबादेवीला जाऊन मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेसोबतच वेगवेगळ्या मुद्द्यावंर भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या पुण्याईमुळे चंद्रकांत पाटील कोल्हापूर आणि पुण्यातून निवडून येतात असं छगन भुजबळ यांनी म्हटलं असून यावर बोलताना ते म्हणाले की, “भाजपा युवा मोर्चाच्या बैठकीत बोलताना मी कोणतीही परंपरा नसताना आयुष्यात मोठं व्हायचं आहे असं मी सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे आयतं मिळालं, तसं तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला परिश्रम करावे लागतील असा संदर्भ होता. आता तेवढंच एक वाक्य काढून बोलायचं असेल तर ठीक आहे”.

लोकसत्ता विश्लेषण : पंतप्रधान मोदींचा ताफा अडवणारी शेतकरी संघटना अजूनही आंदोलन का करत आहे?; जाणून घ्या…

“माझे वडील ना सरपंच होते ना ग्रामपंचाय सदस्य होते. भुजबळांना काय माहिती आहे? आयुष्यातील ऐन तरुणाईतील १३ वर्ष मी संघटनेसाठी घर सोडलं होतं. मला माझी टीमकी वाजवण्याची सवय नाही भुजबळ. आम्ही एका वाडीत राहत असल्याने त्यांना ओळखतो. भुजबळांचा जो पालिकेचा वॉर्ड आहे तिथे आजही माझं घर आहे. आयुष्याची २० ते ३३ वर्षे मी संघटनेसाठी दिली. मी देशभरात प्रवास केला आहे. त्यामुळे भुजबळांनी मला शिकवू नये,” असंही यावेळी ते म्हणाले.

नाना पटोलेंवर टीका

नाना पटोले यांनी पंजाबमध्ये जे काही झालं ते नौटंकी असल्याचं म्हटलं असून इंदिरा गांधी आणि मोदींची तुलना होऊ शकत नाही असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “तुलना कोणाचीच कोणाशी होत नाही. पण इंदिरा गांधींशी तुलना करुन त्यांच्याप्रमाणेच मोदींचं व्हावं अशी अपेक्षा करत आहात का? आपण काय बोलतो, त्याचा काय अर्थ लागतो याचा आपल्याला तरी पत्ता असतो का. नौटंकी तर तुम्ही करत आहात..विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा देता, राज्याचे अध्यक्ष होता, मंत्रिमंडळाची इच्छा व्यक्त करता”.

शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरेंना आयती थाळी मिळाल्याच्या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांनी बाळासाहेबांनी भाजपाला राज्याची आयती थाळी दिली आहे असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचं इतिहासाचं ज्ञान कमी तरी आहे किवा ते वेड पांघरत आहेत. शेवटी भारतीय जनसंघाची स्थापना १९५१ साली झाली. अगदी भाजपाची स्थापना १९८० मध्ये झाली. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेव्हा देशातील नऊ राज्यांमध्ये एकत्रित का असेना पण सरकार आलं होतं. त्यामुळे कोणी कोणाला मोठं केलं हे सर्व जगाला माहिती आहे”.

“याच भाजपाने आपल्यावर पाण्याचा मारा केला आणि कुंपण…”, शेतकरी नेत्याने बसवर उभे राहून मानले आंदोलकांचे आभार, व्हिडीओ व्हायरल

पुढे ते म्हणाले की, “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”.

“उद्धव ठाकरेंनी कधी पालिकेचीही निवडणूक लढवली नाही हेदेखील खरं आहे. ज्या मुंबई शहरात २० वर्षांपासून त्यांचं राज्य आहे तिथेही निवडणूक लढण्याची हिंमत दाखवली नाही. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा निवडणूक लढवली नाही. त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेबांची पुण्याई आहेच..त्याच्याच आधारे त्यांना आयती थाळी मिळाली हे माझं मत आहे,” असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp chandrakant patil ncp chhagan bhujbal shivsena maharashtra cm uddhav thackeray sgy
First published on: 07-01-2022 at 08:55 IST