राज्यात आधी शिवसेना-भाजपा युती तुटून महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. आता शिवसेना फुटून शिंदेगट आणि भाजपा युतीचं सरकार सत्तेत आलं. या दोन्ही घटनांमध्ये घडलेली एक समान गोष्ट म्हणजे शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेलं. या दोन्ही पक्षांकडून गेल्या तीन वर्षांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतलाच मोठा गट फुटून आम्हीच शिवसेना असल्याचा दावा करत असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा पक्षबांधणीचं काम हाती घेतल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेवर ओढवलेल्या परिस्थितीबाबत बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

बावनकुळे-राज ठाकरे भेट, चर्चांना उधाण

चंद्रशेखर बावनकुळेंनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी माध्यमांशी बोलताना दिली. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. यासंदर्भात विचारणा केली असता बावनकुळेंनी “युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

बेगडी हिंदुत्व – उद्धव ठाकरेंवर टीका

यावेळी बोलताना बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत टीका केली. “मला हे माहिती नाही की तिकडे विहिंप किंवा संघाचे कोणते कार्यकर्ते गेले आहेत. आजकाल तिकडे इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची पद्धत सुरू झाली आहे. विहिंप आणि संघाची कट्टर विरोधक असलेल्या संभाजी ब्रिगेडशी ते युती करतात आणि दुसरीकडे या भाषेत बोलत आहेत. ते सध्या गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यांची नेमकी भूमिका कळत नाहीये. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही”, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

भाजपा-मनसे युती होणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचं सूचक विधान, तर्क-वितर्कांना उधाण!

“हे मात्र नक्की आहे की उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व हे खरंच बेगडी आहे. शरद पवार आणि काँग्रेससोबत जे बसतात, ते कशाला आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात? त्यामुळे याबाबत बोलण्यात अर्थ नाही. पुढच्या काळात मतदानातून जनता ठरवेल की खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं”, असंही बावनकुळेंनी यावेळी नमूद केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“उद्धव ठाकरेंनी सगळं सोडून दिलंय”

“मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतो. उद्धव ठाकरे आता खरंच हिंदुत्ववादी राहिले नाहीयेत. त्यांनी सगळं सोडून दिलं आहे. कौटुंबिक प्रेमात ते सगळ्या गोष्टी विसरून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही”, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.