पूर्वीपासूनच रत्नागिरी जिल्ह्य़ात जनसंघाचा प्रभाव राहिला आहे. माजी खासदार बापूसाहेब परुळेकर, माजी आमदार कै. कुसुम अभ्यंकर व कै.  शिवाजीराव गोताड, सध्यापेक्षा अतिशय विपरीत व प्रतिकूल राजकीय परिस्थितीत जिल्ह्य़ात विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक संस्थांचा पाया घालणारे कै. डॉ. तात्यासाहेब नातू अशी कर्तबगार नेत्यांची दीर्घ परंपरा या पक्षाला लाभलेली आहे; पण गेली सुमारे दहा-पंधरा वष्रे या पक्षाचा आलेख सातत्याने घसरताच गेला आहे. ही घसरण अजूनही भाजपला रोखता आलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्मधील नगर परिषद-नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. पण राज्याच्या सत्तेत ‘मोठा भाऊ’ असलेल्या भाजपाने मालवण वगळता सर्वत्र हट्टाने स्वबळावर निवडणुका लढवल्या आणि ७ नगर परिषदा व २ नगर पंचायतींपैकी एकाही ठिकाणी या पक्षाला कमाल पाच-सहा जागांपलिकडे  मजल मारता आली नाही.

याउलट कोकणातील मराठी माणसाची मुंबईशी पूर्वापार जोडलेली नाळ सेनेने  मुंबई व कोकण या दोन्ही ठिकाणी घट्ट पकडून ठेवली आहे. निवडणूक कोणतीही असो, त्याच साखळीतून सेनेचे नेते आणि कार्यकर्ते येथील वाडय़ा-वस्त्यांपर्यंत जिवंत संपर्क राखून असतात आणि गरजेनुसार सर्व प्रकारची रसद पुरवत असतात. त्यामुळे कोकणी माणसाचे या पक्षाशी केवळ निवडणुकीपुरते संबंध नसतात. येथील गणपती किंवा शिमग्यासारख्या सणातही सेनेच्या टोप्या किंवा टी-शर्ट दिसतात. अशा प्रकारचा ‘सामाजिक अभियांत्रिकी’चा प्रयोग अन्य कोणत्याच पक्षाला येथे जमलेला नाही.  म्हणूनच भास्कर जाधव किंवा अगदी नारायण राणेंसारखी नेतेमंडळी सोडून गेली तरी सेना पुन्हा उभारी घेऊ शकली कारण या पक्षाचे सैन्य हालले नाही. सेनेच्या नेत्यांनी नवे पर्याय उभे करत या सैन्याला पुन्हा बळ दिले.

भाजपमध्ये दुष्काळ

सेनेसारख्या कार्यकर्त्यांच्या फौजेच्या अभावाबरोबरच भाजपामध्ये आता नेत्यांचाही दुष्काळच आहे. गेली सुमारे पंधरा-वीस वष्रे तेच ते चेहरे पक्षाच्या तालुका किंवा जिल्हा पातळीवरील संघटनात्मक खुच्र्या अडवून बसलेले दिसतात.त्यात मूलभूत संघटनात्मक बदल करण्याची चिन्हे पक्षश्रेष्ठींकडून दिसत नसल्यामुळे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना  उत्साहच राहिलेला नाही.  कोकणापुरती तरी भाजपालाही आता बदलाची नितांत आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp downfall in ratnagiri election
First published on: 30-11-2016 at 01:53 IST