नांदेड : काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून २५ वर्षांहून अधिक काळ नांदेड-वाघाळा शहर मनपावर आपले वर्चस्व राखणार्‍या अशोक चव्हाण यांच्यावर आता या संस्थेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी येणार आहे. या पक्षाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी ५ वर्षांपूर्वी नांदेडला येऊन अशोक चव्हाण हे ‘लीडर’ नाही तर ‘डीलर’ आहेत, अशी घणाघाती टीका केली होती; पण आता तेच चव्हाण भाजपाचे ‘लीडर’ होणार आहेत.

नांदेड मनपाच्या प्रभागरचनेचे प्रारुप बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आले. त्यासुमारास मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकर प्रभृती अशोक चव्हाण यांच्या मुंबईतील घरी गणपती दर्शनानिमित्त एकत्र जमले होते. भाजपा शहराध्यक्ष राजूरकरही तेथे होेेते. नांदेड मनपा निवडणुकीसंदर्भात त्यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असावी, असा अंदाज आहे.

२०१७ सालच्या मनपा निवडणुकीत भाजपाने तत्कालीन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना प्रभारी करून स्थानिक नेतृत्व शिवसेनेचे तत्कालीन आमदार चिखलीकर यांच्याकडे सोपविण्याचा ‘प्रताप’ करत चव्हाण यांच्या काँग्रेसी वर्चस्वाला मनपातून हद्दपार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ८१ पैकी ७३ जागा जिंकून चव्हाण यांनी भाजपाचे आव्हान एकहाती परतवले होते.

वरील निवडणुकीपासून नंतरच्या राजकीय सभांमध्ये फडणवीस यांनी नांदेडमध्ये चव्हाणांवर कठोर शब्दांत टीका केली. अशोक चव्हाणांचा पराभव करण्यासाठी आम्हाला एकटे चिखलीकर पुरेसे असल्याचे विधान त्यांनी मनपा निवडणुकीच्या सभेत केले; पण चिखलीकर आणि भाजपाचे ‘कमळ’ चव्हाणांनी तेव्हा फुलू दिले नाही. नंतरच्या एका सभेत फडणवीस यांनी अशोक चव्हाण ‘लीडर’ नव्हे तर ‘डीलर’ असल्याचा प्रहार केला.

मागील वर्षी चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा माध्यमांनी फडणवीसांच्या वरील वक्तव्याची आठवण करून दिली होती. आता नांदेड जिल्ह्यातील मनपा, नांदेड जि.प. व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाची सारी भिस्त चव्हाण-राजूरकर या दुकलीवर असल्याचे दिसत आहे. चव्हाण हे आता भाजपासाठी ‘लीडर’ झाले असले, तरी त्यांचा हा निर्णय नांदेड महानगरातील बहुसंख्य मतदारांच्या पचनी पडला नाही, हे लोकसभा निवडणुकीतल्या मतदानातून स्पष्ट झाले होेते. भाजपाच्या मित्र पक्षांतल्या स्थानिक नेत्यांशी त्यांचा सुसंवाद नसल्यामुळे मनपा निवडणुकीमध्ये महायुती होण्यात मोठी अडचण निर्माण होईल, असे दिसत आहे.

नांदेड शहर, वाघाळा-सिडको परिसर आणि दोन्ही तरोड्यात पसरलेल्या नांदेड महानगराचे २० प्रभाग असून प्रत्येक प्रभागाची सुधारित रचना बुधवारी जाहीर झाल्यामुळे मनपाच्या निवडणुकीची पहिली प्रक्रिया सुरू झाली आहे. या रचनेतील काही बदलांवर उलटसुलट चर्चा आता होत असली, तरी त्यावर १५ सप्टेंबर हरकती किंवा सूचना दाखल करता येणार असून त्यानंतर सुनावणी ठेवली जाणार असल्याचे मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी जाहीर केले आहे.

प्रभागरचना अंतिम झाल्यांनतर ऑक्टोबर महिन्यात प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्यात येईल. हे काम पूर्ण झाल्यावर निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम आखता येणार आहे. इतर राजकीय पक्षही निवडणूक तयारीला लागले असले, तरी मनपाच्या २८ वर्षांमध्ये या संस्थेवर भाजपाचा झेंडा कधी फडकला नाही. आता त्या ध्वजारोहणाची जबाबदारी अशोक चव्हाणांवर आली असून काँग्रेसतर्फे खा.रवींद्र चव्हाण आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रताप पाटील चिखलीकर हे त्यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.