अकोला आणि वाशीम जिल्हा परिषदेत प्रस्थापितांनी गड राखले

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : अकोला आणि वाशीम जिल्हा परिषद निवडणुकीत प्रस्थापित पक्षांनी आपले गड राखले असले, तरी अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाची (वंचित बहुजन आघाडी) सत्ता टिकण्यासाठी भाजपने अप्रत्यक्षरित्या हातभार लावल्याने चर्चेला उत आला आहे.

अकोला जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची गेल्या २० वर्षांपासून सत्ता आहे. सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग करून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा एकहाती किल्ला लढवला. सत्तेचे एकमेव केंद्र जि.प. राखण्याचे मोठे आव्हान अ‍ॅड. आंबेडकरांनी लिलया पेलून सर्वाधिक जागा निवडून आणल्या. ५३ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागला. भारिप-बमसं २३, शिवसेना १३, भाजप सात, काँग्रेस चार, राष्ट्रवादी तीन व अपक्षांनी तीन जागा जिंकल्या. सत्तेसाठी आवश्यक २७ चा जादुई आकडा गाठणे कुठल्याही पक्षाला शक्य झाले नाही. त्यामुळे सत्तेसाठी जुळवाजुळव सुरू झाली. अपक्षांपैकी दोन सदस्य भारिप-बमसंचेच बंडखोर असल्याने त्यांची साथ मिळाली. त्यामुळे भारिप-बमसंची सदस्य संख्या २५ वर गेली.

समोरून दुसरा क्रमांकाचा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेनेही सत्तेसाठी प्रयत्न सुरू केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व एका अपक्षाची मोट बांधल्याने महाविकास आघाडीकडे २१ सदस्यांचे समर्थन होते. सात सदस्य असलेल्या भाजपची निर्णायक भूमिका होती. भाजपला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी प्रयत्न केले. नेत्यांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, शेवटपर्यंत एकमत झाले नाही. वरिष्ठ पातळीवरील भाजप व शिवसेनेतील वितुष्टामुळे अकोला जिल्हा परिषदेत तरी हे दोन्ही पक्ष एकत्र कसे येणार, यावर मोठे प्रश्नचिन्ह होतेच. त्यानुसार भाजपने तटस्थ भूमिका घेत मतदानाच्या वेळी सभागृहातून बाहेर पडणे पसंत केले. त्यामुळे भारिप-बमसंच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. अध्यक्षपदी भारिप-बमसंच्या प्रतिभा भोजने, तर उपाध्यक्षपदी सावित्री राठोड यांची निवड झाली. २५ विरूद्ध २१ मतांनी ते निवडून आले.

वाशीममध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग

वाशीम जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखली. सर्वपक्षांनी स्वबळावर निवडणूक लढल्यानंतर सत्तेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये भारिप-बमसं देखील सहभागी झाला आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची वर्णी लागली. वाशीम जि.प. निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागला होता. १२ जागांसह सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला, काँग्रेसला नऊ जागा मिळाल्या. शिवसेना सहा जागांवर विजयी झाली. निकालोत्तर सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यांना भारिप-बमसंचीही साथ मिळाली. महाविकास आघाडीकडे ३५ सदस्यांचे संख्याबळ असल्याने विरोधकांकडून सत्तास्थापनेच्या हालचालीच झाल्या नाहीत. त्यामुळे महाआघाडीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष बिनविरोध खुर्चीवर विराजमान झाले.

नव्या युतीबाबत चर्चा..

प्रत्येक निवडणुकीमध्ये भारिप-बमसं व भाजप एकमेकांच्या विरोधात लढतात. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर नेहमीच भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य करतात. मात्र, लोकसभा, विधानसभा व स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याऐवजी अ‍ॅड. आंबेडकर स्वबळावर लढतात. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होतो, असा आरोप काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येतो. अ‍ॅड. आंबेडकरांची भूमिका नेहमीच भाजपसाठी पोषक ठरल्याचा इतिहास आहे. मात्र, उघडपणे दोन्ही पक्षांनी कधी एकमेकांचे समर्थन केले नाही. जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या बहिर्गमनाच्या भूमिकेमुळे भारिप-बमसंला अप्रत्यक्ष लाभ झाला. हे नवे समीकरण घडवून आणले की घडले यासह लोकसभा निवडणुकीतील अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेची भाजपकडून ही परतफेड तर नव्हे ना? यासारख्या अनेक प्रश्नांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या भूमिकेमुळे आम्हाला हातभार लागला. भाजप काँग्रेसला मतदान करणे शक्य नव्हते. डावे उजवीकडे, तर उजवे डावीकडे जाऊ शकत नाहीत. त्याचा फायदा झाला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पण आमच्यासाठी पोषक ठरली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप-बमसं