Ashish Deshmukh On Dhananjay Munde Dilip Walse Patil : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत सामना होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांत जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. मात्र, असं असतानाच महायुतीत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. अशातच भाजपाचे नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “अनिल देशमुख यांच्या दबावामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दुर्लक्ष करत असून राजकारण करत आहेत”, असा आरोप आशिष देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

आशिष देशमुख काय म्हणाले?

“नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तसेच त्यांना पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आज २२ वर्षानंतर १ हजार ४४४ कोटींची वसूली त्यांच्याकडून करण्याच्या संदर्भात सहकार विभागाने आणि सहकार मंत्र्यांनी काही दिवसांपासून दिरंगाई केली. त्या विरोधात नागपूरच्या रामटेकमध्ये शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. आता मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा हीच विनंती आहे की, सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत. मात्र, तरीही आपण आदेश का देत नाहीत? माझी वळसे पाटलांना विनंती आहे, आपण यासंदर्भातील आदेश द्यावा आणि १ हजार ४४४ कोटींची वसूली करावी”, असं आशिष देशमुख यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “लाडकी बहीण नाही, ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा”, शंभूराज देसाईंनी सुनावलं; महायुतीमध्ये श्रेयवादाची चढाओढ?

देशमुख पुढे म्हणाले, “मी दुसरं हे देखील सांगतो की, मंत्री धनंजय मुंडे हे कृषीमंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत. मात्र, विदर्भातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना अद्याप भरपाई देण्यात आली नाही. २०२१ ची नुकसान भरपाई अद्याप बाकी आहे. यासंदर्भात मी त्यांच्याबरोबर बैठकीचे आयोजनही केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी ही बैठक रद्द केली. अनिल देशमुख यांच्या दबावानुसार मंत्री धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. वेळकाढूपणा करत आहेत. राजकारण करत आहेत. हे होत असावं असं माझं मत आहे”, असा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सुनील केदार यांचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी जुने संबंध आहेत. तसेच अनिल देशमुख यांचेही मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जुने संबंध आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे दोन्हीही मंत्री विदर्भातील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत आहेत. शेतकरी अडचणीत असतानाही हे दोन्ही मंत्री कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत आहेत”, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे.