सांगली : भाजपचे मिरजेतील नेते तथा महापालिकेचे माजी स्थायी सभापती सुरेश आवटी यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष विकास आघाडी या नावाने राजकीय पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. हा प्रकार आपल्या समर्थकांना भाजपची उमेदवारी अग्रक्रमाने मिळावी, यासाठी दबाव तंत्राचा भाग असल्याचे मानले जात आहे.
निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आयुक्त तथा महापालिका प्रशासक सत्यम गांधी यांनी महापालिका निवडणुकीची प्रभागरचना शुक्रवारी प्रसिद्ध केली. प्रभाग रचनेवर दाखल करण्यात आलेल्या १२९ हरकती मान्य करत अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. यानुसार प्रभाग दोन, तीन व आठमध्ये बदल करण्यात आले. तर दाखल झालेल्या ६८ हरकती अंशता मान्य करण्यात आल्या. तर ६८ हरकती फेटाळण्यात आल्या.
महापालिका निवडणुकीसाठी शहरात राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, महायुती व महाविकास आघाडीने निवडणूक लढविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनीही संभाव्य इच्छुकांशी प्राथमिक चर्चा केली आहे.
दरम्यान, भाजप नेते व माजी स्थायी सभापती आवटी यांनी या निवडणुकीसाठी स्वतंत्र राजकीय पक्षाची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहेे. जनसंघर्ष विकास आघाडी पक्षाचे नाव असून, या पक्षाचे अध्यक्ष स्वत: आवटी असून, सचिव सुनील दत्तात्रय मोतुगडे व कोषाध्यक्ष म्हणून महेश मारूती पाटील यांची नावे आहेत. याबाबत पक्षाच्या नोंदणीसाठी कोणाची हरकत असेल तर त्यांनी १५ दिवसांत लेखी हरकत नोंदवावी, असे निवेदन शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले.
दरम्यान, आवटी यांचे दोन पुत्र माजी नगरसेवक संदीप आवटी व निरंजन आवटी यांना गत निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर स्थायी सभापती पद भाजपने दिले होते. मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीची चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत आवटी यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याबद्दल खंत व्यक्त करत जाब विचारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी लोकसभा निवडणुकीवेळी आवटींनी कोणाचे काम केले, असा सवाल मंत्री पाटील यांनी उपस्थित केला होता.
आवटी यांनी स्वतंत्र पक्ष नोंदणीसाठी अर्ज दाखल केल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या ते भाजपमध्ये माजी मंत्री तथा आमदार सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असून, येत्या निवडणुकीमध्ये दोन्ही मुलांना उमेदवारी मिळण्याबाबत शंका उपस्थित केली जात असल्याने अन्य पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत श्री. आवटी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी स्वीकारला नाही.