मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केल्यानंतर आता या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटलांमागे बोलविता धनी कोण आहे? ते समोर येईल, असा दावा खुद्द देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना केला. त्यापाठोपाठ आता त्याचाच पुढचा अंक विधानसभेत रंगू लागल्याचं दिसत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीने केलेलं वक्तव्य आणि त्याच्या अटकेनंतर सुटकेसाठी रोहित पवारांनी फोन केला असा दावा केला आहे. यावरून आज विधानसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी कमी व सत्ताधारी व विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांसाठी जास्त चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा पहिला अंक संपल्यानंतर आता पुढचा अंक विधानसभेत दिसत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी आज विधानसभेत बोलताना आमदार रोहित पवार व शरद पवार यांची नावं घेत गंभीर आरोप केले. तसेच, यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर तालिका अध्यक्षांनी ती मान्य करत तसे आदेशही दिले आहेत.
काय म्हणाले राम कदम?
राम कदम यांनी योगेश सावंत नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला. “सांताक्रूज पोलीस स्थानकात २७ तारखेला अजय पनवेलकर यांनी तक्रार केली. एका व्हायरल क्लिपमध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे. व्हिडीओत एक इसम म्हणतो की ‘देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. देवेंद्र फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले आख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू’. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे सबंध बारामतीहून आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातू रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध आहे रोहित पवारचा? मराठ्यांच्या आडून मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहेत”, असा आरोप राम कदम यांनी केला.
विजय वडेट्टीवारांचा तीव्र आक्षेप
दरम्यान, कोणतीही सूचना न देता सभागृहात रोहित पवार व शरद पवारांचं नाव घेतलं गेलं, असा आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला. “असे शब्द कोणत्याही समाजाबाबत करण्याला कुणीही पाठिशी घालणार नाही. पण सभागृहात कुणाचंही नाव घेताना नोटीस देण्यात आली होती का? शरद पवारांचं नाव घेतलं गेलं, त्यासंदर्भात नोटीस दिली होती का? असंच एखाद्या नेत्याचं नाव कसं घेता येईल? नावं घेतली असतील तर ती कामकाजातून काढून टाका”, अशी मागणी त्यांनी केली.
आशिष शेलार यांची आगपाखड
एकीकडे राम कदम विरुद्ध विजय वडेट्टीवार असा कलगीतुरा चालू असताना आशिष शेलार यांनी विरोधकांवर आगपाखड केली. “किती जातीवादी असता येईल, याचा हा कळस आहे. ‘एक समाज तीन मिनिटांत संपवू, देवेंद्र फडणवीस तुला संपवू’ असं म्हटलं गेलं. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यानं तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. तो स्वत: म्हणतोय की मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे. रोहित पवारांनी स्वत: पोलीस निरीक्षकाला फोन केला. काय संबंध? योगेश सावंतचाही पत्ता बारामती मतदारसंघातला आहे. आता योगेश सावंतच्या मागे कोण कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा संबंध काय? रोहित पवारांनी फोन केला होता का? त्याचं कारण काय?” असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले.