ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडिजच्या खेळाडूशी केली होती. यावरून भाजपा आमदार राम सातपुते यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची नीच प्रवृत्ती आहे, अशा शब्दांत राम सातपुते यांनी टीका केली.
एक व्हिडीओ जारी करत राम सातपुते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर रंगावरून टीका केली. मुळात उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची नीच प्रवृत्ती आहे. ते एका ओबीसी नेतृत्वावर अतिशय खालच्या दर्जाची टीका करतायत. यातून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा ओबीसी द्वेष दिसत आहे.”
हेही वाचा- “वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या…”, भास्कर जाधवांचा बावनकुळेंना इशारा
“एका सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राज्याचं अध्यक्षपद मिळालं आहे. यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे, ही बाब ओबीसी कधीही विसरणार नाही. एका चांगल्या नेतृत्वावर त्यांच्या रंगावरून टीका करण्याचा केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करत आहे. मी त्यांचा निषेध करतो. येत्या काळात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपत चाललेल्या पक्षाला याचं उत्तर निश्चित द्यावं लागेल. हे तेच बावनकुळे आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखालील भाजपामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा बेरंग झाला. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांना येत्या काळात याचं उत्तर द्यावं लागेल” असा इशाराही राम सातपुते यांनी दिला.
हेही वाचा- सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण देण्यास…”
भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
“चंद्रशेखर बावनकुळे हे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. मी गेल्यावेळी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का? वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा”, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी टीकास्र सोडलं होतं.