scorecardresearch

संभाजीराजे छत्रपतींनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास त्या पक्षात जाणार का? आमदार शिवेंद्रराजे म्हणाले…

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास तुम्ही त्या पक्षात जाणार का? असा सवाल करण्यात आला. यावर शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Sambhajiraje Chhatrapati Shivendraraje Bhosale 2

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारत आपला राज्यसभा उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. यानंतर शिवसेनेसह महाविकासआघाडीवर संभाजीराजेंना पाठिंबा न दिल्याचा आरोप करत जोरदार टीका होत आहे. अशातच संभाजीराजे स्वतंत्र पक्ष स्थापन करणार का? असा सवालही विचारला जातोय. या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यास तुम्ही त्या पक्षात जाणार का? असा सवाल करण्यात आला. यावर शिवेंद्रराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “मी आत्ता भाजपचा आमदार आहे. ज्या पक्षाबरोबर मी आहे त्यांच्याबरोबर राहणे चांगले. उगाच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात जाणे योग्य ठरणार नाही.”

“छत्रपती संभाजीराजेंचा ठरवून गेम करण्यात आला”

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, “मराठा समाजाने संभाजीराजेंच्या पाठीशी खंबीर उभे राहावे आणि छत्रपती संभाजीराजेंनीं मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे. छत्रपती संभाजीराजे हे आमच्या छत्रपती कुटुंबातील आहेत. मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे. मात्र, संभाजीराजांचं मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण यामध्ये फार मोठे काम आहे. त्यांनी समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. यावेळी त्यांची खासदारकी गेली असेल, पण योग्य वेळी काय निर्णय घ्यायचा ते पारखून निर्णय त्यांनी घ्यावा.”

हेही वाचा : “जेव्हा जेव्हा आमच्या छत्रपतींना सन्मान देण्याची वेळ येते त्या प्रत्येक वेळी शिवसेनेने…”, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

“छत्रपती संभाजीराजे यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथे पोहोचून त्यांनी मराठा समाजात जागृती केली. समाजाला एकत्र ठेवण्याचे काम केले. संभाजीराजांच्या पुढील कारकिर्दीत मराठा समाजाने त्यांच्यासोबत रहावे. समाजासाठी स्थापन केलेल्या सकल मराठा संस्थेनेही त्यांच्या पाठीशी राहावे. कारण त्यांचे समाजासाठी फार मोठे योगदान आहे. छत्रपती संभाजीराजेंनी मराठा समाजाच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करावे,” असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla shivendraraje bhosale answer will he join sambhajiraje party if he form pbs

ताज्या बातम्या