नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : रस्ता मंजुरी आणि त्याच्या भूमिपूजनाचे श्रेय घेण्यावरून भाजपचे नंदुरबारमधील खासदार आणि आमदारांनी आरोप-प्रत्यारोपातून थेट परस्परांवर टीकेची झोड उठवली आहे. या वादाच्या अनुषंगाने समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या ध्वनिमुद्रित फितीतून या कामाच्या ठेकेदारांकडून पैसे देवाणघेवाणीचा उल्लेख झाल्याने खासदार आणि आमदार यांच्यातील हा वाद केवळ श्रेयवादासाठी आहे की यामागे आणखी काही कारणे आहेत, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. जिल्ह्यातील मोठय़ा नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आले आहेत.

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सीआरएफ निधीतून मंजूर केलेला सोमावल ते नर्मदानगर रस्ता हा भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित आणि शहादा-तळोद्याचे भाजप आमदार राजेश पाडवी यांच्यातील वादाचे निमित्त बनला आहे. या रस्त्याच्या मंजुरीसाठी आपण प्रयत्न केला असून गडकरींनी राज्यातील सर्व आमदारांना ज्या पद्धतीने एक काम मंजूर केले, त्याचाच एक भाग म्हणून आपल्यालादेखील हा रस्ता मंजूर केल्याचा दावा आमदार पाडवी यांनी करीत रस्ता मंजुरीचे श्रेय घेतले. एवढेच नव्हे तर, पत्रकार परिषदेतून त्यांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांना लक्ष्य करीत फुकटच्या श्रेयवादासाठी खासदार पक्षातील स्थानिकांनाही विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन करतात, असा आरोप केला. केंद्राच्या योजना जणू आपल्या घरातून दिल्याच्या आविर्भावात त्या वागत असल्याची टीका करत त्यांनी खासदारांआधी या रस्त्याचे दोन ठिकाणी भूमिपूजन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार पाडवींच्या आरोपांना खासदार डॉ. गावित यांनी प्रत्युतर देत या रस्त्याच्या  कामाचे स्वतंत्र भूमिपूजन करत या रस्त्यासाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे आमदारांना भ्रमणध्वनी केल्यावर ते उचलत नाही. माझ्या स्वीय साहाय्यकांनी त्यांच्या स्वीय साहाय्यकांशी संपर्क साधून उद्घाटनाचे आमंत्रणही दिले. मात्र आमदार पाडवींच्या स्वीय साहाय्यकांनी  शिवीगाळ केल्याचा आरोप खासदारांनी केला.  पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार असल्याचे डॉ. गावित यांनी म्हटले आहे. उद्घाटन आणि श्रेयवादाच्या मानापमानाच्या नाटय़ात समाजमाध्यमांवर पसरलेल्या ध्वनिमुद्रित फितीमुळे संभ्रम निर्माण झाले आहे. स्वीय साहाय्यकांच्या या संवादात थेट पैशांच्या देवाणघेवाणीचाही आरोप झाल्याने या प्रकरणात नेमकं काय गुंतले आहे, असा काहीसा प्रश्न निर्माण होत आहे. मुळात खासदार डॉ. गावितांचा जिल्ह्यातील वाढता प्रभाव हा भाजपच्या एका गटाच्या चिंतेचा विषय झाला आहे. दुसरीकडे पक्ष संघटन हे पाडवींना डॉ. गावितांचा पुढचा पर्याय म्हणून पुढे करत असल्याचे म्हटले जात आहे. याआधीही शहादा-तळोदा मतदारसंघाचे भाजप आमदार राहिलेले उदेसिंग पाडवी आणि डॉ. विजयकुमार गावित गटाचे कधीच पटलेले नाही. आता त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते. डॉ. विजयकुमार गावित हे दोन निवडणुकीपासून भाजपवासी झाले असले तरी जिल्ह्यातील भाजपच्या एका गटाला त्यांचा प्रभाव नकोसा वाटतो. मात्र त्यांची जिल्ह्यातील स्वतंत्र ताकद भाजपला बळ देणारी ठरते. रस्ते मंजुरी आणि त्याच्या श्रेयवादावरून भाजपमधील अंतर्गत वाद आगामी निवडणुकीत अधिक जोर पकडेल, अशी शक्यताही व्यक्त केली जाते.