शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. या टीकेवर असंसदीय शब्द असल्याचं म्हणत भाजपाकडून निशाणा साधण्यात आला आहे. एकीकडे ईडीनं संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली असताना दुसरीकडे राऊतांनी देखील सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेत घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांवर केला आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

“संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या…”

“दोन दिवस बातम्या मी पाहिल्या. त्यात सन्माननीय संजय राऊत यांनी जे विचार मांडले, ते पाहाता पत्रकार परिषदेत जी भाषा वापरली, शिव्या घालण्यात आल्या, ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही. संपादक पदावरचा माणूस ज्या शिव्या घालतो, त्या मी उच्चारू इच्छित नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

“तुम्ही कधी शिवसैनिक होता?”

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राऊतांच्या विधानाचा संदर्भ घेत त्यांच्यावर निशाणा साधला. “म्हणे शिवसेना कुणाला घाबरत नाही. पण तुम्ही कधी शिवसैनिक होतात? संपादक म्हणून आलात तुम्ही पगारधारी नोकरदार म्हणून. तोल गेला की माणसं अशी बेफाम बोलायला लागतात. तेच संजय राऊतांच्या बाबतीत झालंय. पक्ष वाढवण्यासाठी हे विचार आहेत की पक्ष संपवण्यासाठी याचा विचार त्यांचे पक्षप्रमुख करतील”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत येताच संजय राऊतांचं भाजपाला आव्हान; म्हणाले, “ठिणगी पडली आहे, यापुढे…!”

“संजय राऊतांना सोडून दिलं आहे”

“पुढच्या वेळी आंदोलन होईल की यशवंत जाधव यांच्यावर चुकीची रेड टाकण्यात आली. कारण शिवसेनेचा पैसे खाण्याचा धंदा आहे. संजय राऊत सांगू शकतील हेसुद्धा. काही तारतम्य नाही. शुद्धीवर असलेला माणूस असं काही बोलू शकत नाही. राज्याच्या प्रश्नांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं म्हणून संजय राऊतांना सोडून दिलं आहे. कशाही उड्या मारा”, असं नारायण राणे म्हणाले.

“नेमके पक्षप्रमुख कोण आहेत?”

“संजय राऊत काल-परवा आले. त्यांना काय माहिती आहे? त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी हवं ते लिहिलं आहे. मला प्रश्न पडला आहे की पक्षप्रमुख कोण आहे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की हे आहेत? याचा खुलासा लवकरच होईल. पण ज्याअर्थी आमदार-खासदार नाहीत, त्याअर्थी संजय राऊत तुम्ही एकाकी पडणार. किरीट सोमय्यांवर खोटे आरोप करून मी धुतल्या तांदळाचे आहात असं दाखवण्याचा प्रयत्न करू नका. माझ्याएवढी माहिती किरीट सोमय्यांकडेही नाही”, असं देखील नारायण राणे यावेळी म्हणाले.

नारायण राणेंचा संजय राऊतांना इशारा

“राज्यात आमचे १०५ आमदार आहेत. तुमचे ५६ आहेत. पुढच्या वेळी निम्मे तरी येतील का याचा विचार करा. तुमच्या वागण्याने नाही येणार. नारायण राणे भाजपामध्ये आहे, एवढा तरी विचार करा. बाकीच्यांचा मुद्दा नंतर येतो. कधी समोर येऊन नजर भिडवायची ताकद नाही आणि तुम्ही चॅलेंज देता. चारही बाजूंनी पोलीस, घोळके. म्हणे प्रचंड गर्दी. एका बसमध्ये ४० लोक जमतील फारतर. आणि कशासाठी जमली गर्दी, नाचायला? यामुळे पक्ष वाढणार नाही. या पक्षाला संपवण्याचं काम संजय राऊत चांगल्या पद्धतीने करत आहेत. आम्हाला त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. पण संजय राऊत, भाजपाच्या एकालाही कोणत्याही मार्गाने जीविताला धोका निर्माण केलात, तर भाजपा काय आहे, ताकद काय आहे हे आपल्याला दाखवावं लागेल. ती वेळ आणू नका”, असा इशारा नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे.