शहापूर : आसनगाव येथील भारंगी नदीत बुडालेल्या सार्थक कोळी या तरुणाचा मृतदेह चार दिवसांनी शोध मोहीम पथकाला सापडला. तर, शहापूर येथील भारंगी नदीत शुक्रवारी बुडालेल्या ९० वर्षीय वृद्धाचा शोध अद्याप सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली.

कल्याण येथील सार्थक कोळी(१७) हा बुधवारी डिप्लोमाच्या दुसऱ्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी जोंधळे महाविद्यालयात आला होता. परंतू, प्रवेश प्रक्रियेसाठी अवधी असल्याने आसनगाव येथील भारंगी नदीत मित्रांसह पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे सार्थक पाण्यात बुडाला. तर, शुक्रवारी शहापुर जवळून वाहणाऱ्या भारंगी नदीत कळंभे येथील दत्तात्रय रोकडे (९०) वृद्ध बुडाले. त्याच दरम्यान, माहुली किल्याच्या पायथ्याशी असलेल्या धबधब्याखाली असलेल्या डोहातील पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे सॅमराज राधा (२१) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. परंतू, सार्थक आणि दत्तात्रय यांच्या मृतदेहाचा शोध सुरु होता. सार्थकचा मृतदेह शनिवारी म्हणजेच चार दिवसांनी सापडला. तर, दत्तात्रय रोकडे यांचा शोध अद्याप सुरु असल्याचे शहापुर पोलिसांनी सांगितले. या तीन घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.