रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या बारसू भागात सापडलेल्या कातळ शिल्पांविषयी येथील शेतक-यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. या याचिकेनुसार ही कातळ शिल्पे जतन करण्याच्या सुचना व त्यावर ४ कोटी ३२ लाखाचा निधी खर्च करण्याचा आदेश मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत.
रत्नागिरीतील राजापुर बारसू नाणार येथे येणा-या रिफायनरी प्रकल्पांसाठी जमीन संपादनाचे काम सुरु असताना या बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात कातळ शिल्पे असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे येथील शेतकरी गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांनी या शिल्पांचे जतन होन्यासाठी अॅड. हमजा लकडावाला यांच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.
या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ वकील गायत्री सिंग यांनी कोकणातील कातळशिल्पांचे ऐतिहासिक महत्त्व नष्ट होत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
बारसू, सोलगाव आणि देवाचे गोटणे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कातळशिल्पे आढळून आली आहेत. त्यामुळे हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या कातळशिल्पांचे जतन करा. या कातळशिल्पांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला ४ कोटी ३२ लाखांचा निधी राज्य शासनाने यावर खर्च करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या १७ स्थळांव्यतिरिक्त अन्य स्थळे सुचविण्याची मुभा याचिकाकर्त्यांना न्यायालयाकडून देण्यात आली आहे.