कन्नड तालुक्यामधील नेवपूर येथे आढळलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उकललं आहे. १२ दिवसांपूर्वी पोलिसांना एक अनोळखी मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं आहे. कडुबा विठ्ठल सोळुंके असं या मृत व्यक्तीचं नाव आहे. ही हत्या दुसरी कोणी नाही तर त्याच्या मेहुण्यानेच केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवपुर येथील पूर्णा नेवपुर मध्यम प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाचा गळा आवळून धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अप्पर पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी दोन पथकं तयार करण्यात आली होती.

मृताच्या हनुवटीला आणि पायाला टाके होते, त्यावरून एका बाईने मृताची ओळख पोलिसांना सांगितली. त्यानुसार,पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन विचारपूस केली असता मृत व्यक्ती कडुबा हा त्याच्या पत्नीला दारू पिऊन नेहमी त्रास देत होता म्हणून मेहुण्यानेच हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांनी मेहुणा सोमीनाथ खांदवे याला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण आपला पती १० दिवसांपासून बेपत्ता असतानाही पत्नीने पोलिसात तक्रार का केली नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या हत्येमध्ये अजून कोणी सामील आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या केली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय आहेर पुढील तपास करत आहेत.