कराड : भांडवली बाजारातील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याला १ कोटी १० लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या फसवणूकप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल झाला असून, दोघांनी अन्य काही जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

माधव मनोहर काळे (६१, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार किशोर अधिकराव पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील माधव काळे यांची जानेवारी २०२३ मध्ये किशोर पिसाळ यांच्याशी ओळख झाली. पिसाळने स्वत:ला सैन्य दलातून निवृत्त झाल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच भांडवली बाजारात गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगून, दीपक यादव याच्याशी माधव काळे यांची ओळख करून दिली. दीपक यादव यानेही मी सैन्य दलातील निवृत्त अधिकारी असल्याचे माधव काळे यांना सांगितले. तसेच भांडवली बाजारात गुंतवणूक केल्यास मी महिन्याला ४ टक्केप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे आमिष दाखवले. या दोघांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून माधव काळे यांनी वेळोवेळी एकूण १ कोटी १० लाख रुपये दीपक यादव याच्या बँक खात्यात वर्ग केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला माधव काळे यांना संशयितांनी काही रक्कम दिली. मात्र, त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. संशय आल्यामुळे काळे यांनी सर्व पैसे परत मागितले. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, माधव काळे यांनी अधिक चौकशी केली असता संदेश चव्हाण (रा. मुंढे, ता. कराड) यांची ४ लाख, राजेंद्र पिसाळ (रा. करवडी, ता. कराड) यांची १ लाख ९० हजारांची अशीच फसवणूक केली असल्याचे त्यांना समजले. तसेच आणखी काही गुंतवणूकदार फसले असल्याचा संशय त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे. फौजदार दीपक वागवे तपास करीत आहेत.