Political Leader Statement News in Today : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवसभरात कोणत्या पाच नेत्यांनी काय विधानं केली आहेत? याबाबत जाणून घेऊयात…
‘माझ्या पत्नीने जाळून घेतलं नव्हतं, तर…’ रामदास कदमांचं अनिल परबांना प्रत्युत्तर
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नीच्या संदर्भात केलेल्या विधानाला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कदम म्हणाले की, “माझ्या पत्नीच्या संदर्भात अनिल परब जे बोलले त्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. हे कसे लोकं आहेत, एखाद्याच्या आईविरोधात किंवा पत्नीबाबत बदनामी करून राजकारण करतात. दोन स्टोव्ह होते, त्यामध्ये एका स्टोव्हमधून साडीला आग लागली आणि भडका उडाला. तेव्हा माझ्या पत्नीला मी वाचवलं. त्यानंतर सहा महिने पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र, आता जे बदनाम केलं जातय, त्याविरोधात आम्ही त्यांना कोर्टात खेचणार आहोत.”
“जरा तरी स्वत:ची पत सांभाळून राहा”, चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांना सुनावलं
मंत्री चंद्रकांत पाटील हे आमदार रोहित पवार यांच्यावर संतापल्याचं पाहायला मिळालं. रोहित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निलेश घायवळ प्रकरणावरून टीका केली होती. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “रोहित पवारांना काय काम धंदा आहे? लई नेता व्हायला लागला. जरा तरी स्वत:ची पत सांभाळून राहा. मला रोहित पवारांनी शिकवण्याची वेळ आलेली नाही. निलेश घायवळ विषयामध्ये मी काय केलं जाहीरपणे सांगू का? मग त्या प्रकरणात आपोआप लुकाऊटची ऑर्डर निघाली का? त्यांना प्रत्येक वेळी ढोल वाजवण्याची सवय आहे, तशी सवय आम्हाला नाही.”
‘भाजपाने केलं तर अमरप्रेम, आम्ही केलं तर लव्ह जिहाद?’ : उद्धव ठाकरे
“आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? चंद्राबाबू हिंदुत्ववादी आहेत का? भाजपाचे मुस्लिम सौगात ए मोदी वाटत आहेत, ३२ लाख लोकांना सौगात ए मोदी वाटतात. तरीही ते हिंदुत्ववादी. म्हणजे याचा अर्थ असा की भाजपा जे करेल ते अमर प्रेम आणि इतरांनी केलं तर लव्ह जिहाद. असं कसं होऊ शकतं? भाजपाने सौगात ए मोदी वाटलं तरी अमर प्रेम आहे” अशी जळजळीत टीका उद्धव ठाकरेंनी केली.

‘बाळासाहेबांच्या पार्थिवाबाबत सीबीआय चौकशी करा’ : रामदास कदमांची मागणी
“बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खरंच मातोश्रीवर ठेवलं होतं का? याची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहिणार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबांनी न्यायालयात जावं. अनिल परबांना आपण काय बोलतो याचं भान असावं. आम्ही सर्व नेते मातोश्रीपासून लांब झालो आणि त्यानंतर ते मातोश्रीचे मालक झाले का? अन्यथा अनिल परब कोण होते?”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

“बाळासाहेबांच्या मृत्यूवरुन आरोप करणारे कदम नीच, अंतिम क्षणी..”; अनिल परबांची टीका
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणात रामदास कदम यांनी जे आरोप उद्धव ठाकरेंवर केले त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आक्रमक झाला आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडली. रामदास कदम यांनी नीचपणा केला आहे असं अनिल परब म्हणाले. “रामदास कदम यांनी दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केला आहे. याला नीच हाच एक शब्द लागू होतो. या आरोपांचं उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नव्हती. कारण पोरीबाळी नाचवून आणि त्यांची दलाली खाऊन बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही. पण आमच्या दैवताच्या म्हणजेच बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे मी उत्तर देतो.” असं अनिल परब म्हणाले.